महिला काँग्रेस शहरात उभारणार ‘राईट टू’ चळवळ; स्वच्छता गृहांसाठी करणार पाठपुरावा
By अरुण वाघमोडे | Updated: August 7, 2023 16:31 IST2023-08-07T16:31:46+5:302023-08-07T16:31:59+5:30
सामाजिक कार्यकर्त्या सुनिता भाकरेंनी आपल्या महिला सहकाऱ्यांसह मोठ्या संख्येने काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये शिवनेरी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रवेश केला

महिला काँग्रेस शहरात उभारणार ‘राईट टू’ चळवळ; स्वच्छता गृहांसाठी करणार पाठपुरावा
अहमदनगर : नगर शहरात बाजारपेठ असो की सावेडी, केडगाव, बोल्हेगाव, कल्याण रोड सारखा अन्य उपनगरांचा परिसर. कुठेही महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता गृह उपलब्ध नाहीत. अपवादाने एखादी असलीच तर ती एवढी घाणेरडी असते की यामुळे आजाराचा प्रादुर्भाव त्यातून होतो. त्यामुळे महिलांची मोठी कुचंबना होते. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महिला काँग्रेसच्यावतीने शहरात ‘राईट टू पी’ चवळ राबविण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्या सुनिता भाकरेंनी आपल्या महिला सहकाऱ्यांसह मोठ्या संख्येने काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये शिवनेरी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रवेश केला. यावेळी काळे बोलत होते. यावेळी भाकरेंसह महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषा भगत, ब्लॉक अध्यक्ष पूनम वनंम, राणी पंडित, मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, सुनील क्षेत्रे, आकाश अल्हाट, प्रणव मकासरे सोफियान रंगरेज, अमोल गायकवाड आदी उपस्थित होते. भाकरे म्हणाल्या आम्ही महिला बाजारपेठेत खरेदीसाठी, मुलांच्या शालेय कामासाठी तसेच घरातील अन्य कामांसाठी घरातून बाहेर पडलो की तासंतास मोठ्या काळासाठी घराबाहेर राहावे लागते. मात्र या काळात महिलांना स्वच्छता गृह उपलब्ध असू नये ही आम्हा महिलांना प्रचंड मानसिक त्रास देणारी बाब आहे.
काय आहे ‘राईट टू पी’
महिलांना शहरात त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मोफत, स्वच्छ, सुरक्षित स्वच्छता गृह सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध नाहीत. महिलांच्या हायजिन व आरोग्याच्या दृष्टीने त्या त्यांना देणे ही मनपाची जबाबदारी असून महिलांचा तो अधिकार आहे. शहरातील लाखो महिला, युवतींना हा अधिकार मिळवून देण्यासाठी शहर महिला काँग्रेसने हे अभियान हाती घ्यायचे ठरवले आहे. मुख्य बाजारपेठेसह शहराच्या १७ प्रभागांमध्ये पहिल्या टप्प्यात प्रत्येकी किमान ३ अशा एकूण ५१ ठिकाणी किमान १० सीटर स्वच्छता गृह उभारण्याकरिता महिला काँग्रेस मनपाकडे पाठपुरावा करणार आहे. यासाठी संपूर्ण शहराचे महिला काँग्रेस कार्यकर्त्या सर्व्हेक्षण करणार असून काही जागा मनपा प्रशासनाला सुचविणार असल्याची माहिती उषा भगत, सूनिता भाकरे यांनी दिली.