बनावट चेक बनविणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला दिल्लीत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:34 AM2021-05-05T04:34:56+5:302021-05-05T04:34:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : वेगवेगळ्या फर्म व सरकारी एजन्सीच्या नावे बनावट चेक तयार करून ते बँकेत वटविण्याचा प्रयत्न ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : वेगवेगळ्या फर्म व सरकारी एजन्सीच्या नावे बनावट चेक तयार करून ते बँकेत वटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली येथून अटक केली आहे.
विजेंद्रकुमार ऊर्फ विजेंद्र रघुनंदनसिंग दक्ष (वय ३९ रा. दक्षिण दिल्ली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, जिल्हा न्यायालयाने त्याला ७ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
नगर शहरातील सावेडी येथील स्टेट बँकेच्या शाखेत २२ एप्रिल रोजी बनावट चेक वठविण्यासाठी आले असताना पोलिसांनी तिघांना अटक केली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी अधिक तपास करीत एकूण सात जणांना अटक केली. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार विजेंद्रकुमार हा दिल्लीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली येथे जाऊन तीन दिवसांपूर्वी आरोपीला अटक केली. स्थानिक न्यायालयातून आरोपीचे ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला नगर येथे आणले. दरम्यान, या टोळीने वेगवेगळ्या संस्था व फर्मच्या नावाने बनावट चेक तयार करून ते विविध बँकेत वठविण्याचा प्रयत्न करून शासनाची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल खडके यांच्या पथकाने ही कारवाई केली.