शेतक-यांचे समाधान हेच प्रमुख उद्दिष्ट; जिल्हाधिकारी द्विवेदी यांचा नववर्ष संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 12:00 PM2020-01-05T12:00:45+5:302020-01-05T12:01:28+5:30
केंद्र शासनाने जाहीर केलेली पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना व राज्य सरकारची कर्जमुक्ती योजना अधिकाधिक शेतक-यांपर्यंत पोहोचवण्याला प्राधान्य दिले जाईल. याशिवाय या वर्षात आपले शहर, गाव स्वच्छ ठेवण्याचा संकल्प प्रत्येकाने केला तर स्वच्छता मोहीम आपसूक यशस्वी होईल, अशा शब्दांत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आपला नववर्षांचा संकल्प ‘लोकमत’कडे बोलून दाखवला.
संडे स्पेशल मुलाखत / चंद्रकांत शेळके ।
अहमदनगर : नववर्षात संकल्प तर अनेक गोष्टींचा आहे, परंतु त्यातील काही गोष्टी प्राधान्याने करता येण्यासारख्या आहेत. केंद्र शासनाने जाहीर केलेली पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना व राज्य सरकारची कर्जमुक्ती योजना अधिकाधिक शेतक-यांपर्यंत पोहोचवण्याला प्राधान्य दिले जाईल. याशिवाय या वर्षात आपले शहर, गाव स्वच्छ ठेवण्याचा संकल्प प्रत्येकाने केला तर स्वच्छता मोहीम आपसूक यशस्वी होईल, अशा शब्दांत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आपला नववर्षांचा संकल्प ‘लोकमत’कडे बोलून दाखवला.
नववर्षात कोणत्या कामांना प्राधान्य असेल?
केंद्र शासनाने मागील वर्षीपासून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केलेली आहे. या योजनेंतर्गत प्रतिवर्षी ६ हजार रूपये तीन हप्प्यांत शेतक-यांच्या मिळणार आहेत. विशेष म्हणजे या योजनेसाठी सर्वाधिक सुमारे साडेपाच लाख शेतकरी नगर जिल्ह्यात आहेत. प्रारंभीचा पहिला, दुसरा हप्ता काही शेतक-यांना मिळाला आहे. परंतु अजूनही यातील ५० टक्के शेतकºयांचे आधार लिंकिंग झालेले नाही. त्यामुळे महिनाभरात हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कोणत्याही परिस्थितीत सर्वच्या सर्व पात्र शेतक-यांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. शेतक-यांच्या दृष्टीने दुसरी महत्त्वपूर्ण कर्जमुक्ती योजना राज्य सरकारने जाहीर केलेली आहे. यामध्ये २ लाख रूपयांपर्यंतचे पीककर्ज माफ होणार आहे. या दोन्ही योजनांचे लाभ अधिकाधिक शेतक-यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची यंत्रणा काम करेल.
नव्या प्रशासकीय इमारतीत प्रवेश?
नव्या प्रशासकीय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून हे काम लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे या वर्षातच नवीन इमारतीत कारभार सुरू होईल. उड्डाणपूल, बाह्वळण रस्ता, महामार्गांची दुरूस्ती अशी कामेही वर्षभराच्या काळात मार्गी लागतील.
वर्षभरात जिल्ह्यात उपलब्ध पाण्याचे नियोजन कसे असेल?
जिल्ह्यात यंदा पाऊस चांगला पडलेला आहे. परिणामी पाणीपातळीत वाढ झाली. सर्व धरणेही भरलेली आहेत. त्यामुळे किमान मार्चपर्यंत तरी पाणी टंचाई जाणवण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. तेथून पुढे एप्रिल, मे मध्ये जिल्ह्तील पठार भागात टंचाई जाणवू शकते. तेथे तातडीने टँकरने पाणी उपलब्ध केले जाईल. एकूणच मागील वर्षीइतकी तीव्र टंचाईची तीव्रता यंदा असणार नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे शक्य आहे, असे ते म्हणाले.