ग्रामविकासात सरपंच परिषदेचे मोठे योगदान : पोपटराव पवार यांच्या हस्ते मोबाईल ॲपचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 06:54 PM2021-05-28T18:54:07+5:302021-05-28T18:55:45+5:30
राज्यभर सरपंचांचे हक्क, अधिकार व न्याय-अन्यायावर अविरतपणे काम करणाऱ्या सरपंच परिषदेने सुरु केलेल्या सरपंच परिषद ॲपचे लोकार्पण पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते आदर्श गाव हिवरे बाजार येथे मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
अहमदनगर : राज्यभर सरपंचांचे हक्क, अधिकार व न्याय-अन्यायावर अविरतपणे काम करणाऱ्या सरपंच परिषदेने सुरु केलेल्या सरपंच परिषद ॲपचे लोकार्पण पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते आदर्श गाव हिवरे बाजार येथे मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
पोपटराव पवार म्हणाले, सरपंच परिषदेचे महाराष्ट्रातील चालू असलेले काम उल्लेखनीय आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासामध्ये भर घालण्यात सरपंच परिषदेचा मोठा वाटा आहे. भविष्यामध्ये हे काम जोमाने वाढवावे. राज्य व देशामध्ये सरपंच व शेतकरी जोपर्यंत संघटित होत नाही, तोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही. आता सरपंचांनी संघटित व्हावे, सरपंच परिषदेची ताकत वाढवावी, सरपंच परिषदेच्या सक्रीय सभासदत्व घ्यावे, असे आवाहन पवार यांनी केले. सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सरपंच नेते, दत्ताभाऊ काकडे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते, प्रदेश महासचिव विकास जाधव, अहमदनगर जिल्हाध्यक्ष आबा सोनवणे, राजेंद्र दगडखैर, मुकुंद दुबे उपस्थित होते.
या मोबाईल ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची नोंदणी केली जाणार आहे. पक्षविरहित सरपंच संघटन सरपंच परिषदेच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देत आहोत, असे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे म्हणाले. अनिल गीते, बाबासाहेब सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले. सरपंच परिषदेचे महासचिव महासचिव विकास जाधव यांनी प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले.