निवडणुकीचा खर्च बँकेमार्फतच करा
By Admin | Published: September 13, 2014 10:35 PM2014-09-13T22:35:43+5:302024-03-20T10:59:18+5:30
अहमदनगर : नामनिर्देशन पत्रासोबत बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत जोडणे बंधनकारक असून, निवडणूक बँकेमार्फतच करणे आवश्यक आहे़
अहमदनगर : नामनिर्देशन पत्रासोबत बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत जोडणे बंधनकारक असून, निवडणूक बँकेमार्फतच करणे आवश्यक आहे़ दर तीन दिवसांनी खर्चाचा हिशोब सादर करावा लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शनिवारी दिली़
जिल्हाधिकारी कवडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली़ या बैठकीत कवडे बोलत होते़ बैठकीस सेनेचे आ़ विजय औटी, भाजपाचे बाळासाहेब पोटघन, राष्ट्रवादी काँग्रेसचे किसन लोटके, योगेश दाणी, सुभाष लांडे, सुधीर टोकेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील माळी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी विजय कोते, उपजिल्हाधिकारी अरुण डोईफोडे, विभागीय अधिकारी वामन कदम उपस्थित होते़ कवडे म्हणाले, निवडणूक शांतेत पार पडावी, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे़ जेणे करून निवडणूक निर्भयपणे पार पडेल़ नामनिर्देशनपत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये उमेदवार व त्यांचे चार प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाईल़ त्यापेक्षा अधिक व्यक्तींना दालनात प्रवेश दिला जाणार नाही़ अर्ज दाखल करताना तीनपेक्षा अधिक वाहने १०० मीटरच्या आत आणता येणार नाहीत, असेही कवडे म्हणाले़
उमेदवारी अर्ज दाखल करताना सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मिरवणूक काढता येणार नाही़ अर्ज दाखल करतेवेळी आणली जाणारी वाहने, व्यक्ती, मिरवणुकांवर होणारा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात धरला जाईल़ उमेदवाराने अर्ज दाखल करण्यापूर्वी स्वतंत्र खाते उघडणे बंधनकारक असेल़ कोणत्याही बँकेत खाते उघडून पहिल्या पानाची छायांकित प्रत अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे़ उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते निवडणूक सर्व खर्च खात्यातूनच करणे बंधनकारक आहे़ उमेदवारासाठी २८ लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे़ दर तीन दिवसांनी निवडणूक शाखेकडून खर्च सादर करावा लागेल़ निवडणूक काळात अर्थिक व्यवहार बँकेमार्फत करण्याचा आदेश देण्यात आले आहेत़ उमेदवारी अर्ज, अर्ज दाखल करणे, निवडणुकीचा खर्च, याबाबतच्या नियमांचे पालन बंधनकारक असल्याचे कवडे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)