निवडणूक बिनविरोध करा व गावाला २५ लाखांचा निधी घ्या: आ. नीलेश लंके यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 01:09 PM2020-12-16T13:09:14+5:302020-12-16T13:11:57+5:30
पारनेर - नगर मतदार संघातील ११० ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून ज्या गावातील नागरीक ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून शासनाच्या खर्च वाचवितील, गावातील एकात्मता कायम राखून प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या गावांना आमदार निधीतून 25 लाख रुपये देण्याची घोषणा आमदार नीलेश लंके यांनी केली आहे.
पारनेर : राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणूका येत्या १५ जानेवारी रोजी पार पडणार असून सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर होणार आहे. आ. नीलेश लंके यांच्या पारनेर - नगर मतदार संघातील ११० ग्रामपंचायतींचाही त्यात समावेश असून ज्या गावातील नागरीक ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून शासनाच्या खर्च वाचवितील, गावातील एकात्मता कायम राखून प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या गावांना आमदार निधीतून २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा आ. लंके यांनी केली आहे.
तालुका पातळीवरील राजकारण करणारे पुढारी गावपातळीवर गटबाजी होवो अथवा हाणामाऱ्या होवोत. ग्रामपंचायत निवडणूकीकडे सहसा लक्ष देत नाहीत. दोन गट एकमेकांत झुंजले तरी आपल्या निवडणूकीला ते आपल्या बाजून कसे उभे राहतील यासाठी ते दोघांनाही गोंजारण्याचे काम करतात. आ. लंके यांनी मात्र गावागावातील पुढाऱ्यांना थेट आवाहन करून ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध करा, तुम्हाला गावच्या विकासासाठी २५ लाखांचा निधी देतो अशी साद घातली आहे.
आ. लंके सध्या अधिवेशनानिमित्त मुंबईत आहेत. तेथूनच त्यांनी बिनविरोध ग्रामपंचायतींसाठी २५ लाखांच्या निधीची घोषणा केली असून तेथून परतल्यानंतर ते स्वतः निवडणूका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. आतापर्यंत त्यांनी प्रमुख गावांतील गटागटांमध्ये चर्चा करून समेट घडविण्यातही यश मिळविले असून काही मोठया गावांमधील निवडणूका बिनविरोध होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
बिनविरोध निवडणूकीसंदर्भात आ. लंके यांना विचारले असता विधानसभा निवडणूकीचा निकाला जाहिर झाला, त्याच वेळेपासून आपण राजकारण दुर ठेऊन प्रत्येक गावाचा सर्वांगिण विकास करण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले. निवडणूकीत कोणी मतदान केले किंवा केले नाही याचा हिशेब न पाहता सर्वजण आपले बांधव आहेत, मी कुटूंबप्रमुख म्हणून सर्वांना एकत्र करण्याचा प्रामाणीक प्रयत्न नेहमीच करीत राहणार आहे.
विशेषतः ग्रामपंचायत निवडणूकीत मोठे वाद होतात. हाणामाऱ्या होतात. त्यातून एकमेकांमध्ये कटूता निर्माण होते. दोन दिवसांच्या निवडणूकीसाठी कटूता निर्माण होऊच नये, सर्वांनी एकत्र बसून निवडणूक बिनविरोध करावी असा माझा आग्रह असल्याचे त्यांनी सांगितले.
सरपंच ते आमदार !
आमदार नीलेश लंके हे सन २००८, ०९ मध्ये हंगे गावचे सरपंच होते. त्यानंतर पत्नी राणी या पंचायत समितीच्या सदस्या, उपसभापती तसेच सध्या जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. त्यामुळे गावपातळीवरील राजकारण, त्यामुळे होणारे वाद याचा मोठा अनुभव आ. लंके यांच्याकडे आहे. गावामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूकीवरून वाद होऊ नये, सर्वजण गुण्या गोविंदाने नांदावेत यासाठी आ. लंके हे मुुंबईवरून परतल्यानंतर विविध ठिकाणी बैठका घेउन बिनविरोध निवडणूका करण्यासाठी बैठका घेणार आहेत. सरपंच पदावरून आमदार पदापर्यंत पोहचलेले आ. लंके हे राज्याच्या विधीमंडळातील काही मोजक्या आमदारांपैकी एक आहेत.