सेंद्रीय शेती करा-अंजली तेंडुलकरचे करंजीत शेतक-यांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 05:50 PM2018-01-23T17:50:19+5:302018-01-23T17:51:29+5:30
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्या पत्नी डॉ. अंजली तेंडुलकर यांनी मंगळवारी करंजी येथे भेट देऊन शेतक-यांना सेंद्रीय शेती करण्याचे आवाहन केले. अंजली तेंडुलकर यांची करंजी गावास गेल्या सहा महिन्यातील ही दुसरी भेट आहे.
करंजी : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्या पत्नी डॉ. अंजली तेंडुलकर यांनी मंगळवारी करंजी येथे भेट देऊन शेतक-यांना सेंद्रीय शेती करण्याचे आवाहन केले. अंजली तेंडुलकर यांची करंजी गावास गेल्या सहा महिन्यातील ही दुसरी भेट आहे.
रासायनिक शेती केल्याने जमिनीची सुपिकता कमी होते. त्यामुळे शेतक-यांनी सेंद्रीय शेती करण्यासाठी पुढाकार घ्यावा. मी लहान मुलांची डॉक्टर आहे. पुढीलवेळी आल्यावर मुलांच्या व स्त्रियांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करणार आहे, असे तेंडुलकर यांनी सांगितले. करंजी परिसरातील भट्टीवाडी येथील शेतकरी सुरेश सिताराम क्षेत्रे व महादेव गाडेकर यांच्या सेंद्रीय शेतीची तेंडुलकर यांनी पाहणी केली.
पुढीलवेळी येताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना बरोबर घेऊन येण्याची विनंती ग्रामस्थांनी अंजली तेंडुलकर यांच्याकडे केली. सचिन तेंडुलकर यांना करंजीत आणण्याचे आश्वासन देऊन अंजली तेंडुलकर यांनी करंजीकरांचा निरोप घेतला.
सेंद्रिय शेतीवर संशोधन करणा-या संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. गावातील दिलीप अकोलकर व कैलास थोरात या शेतक-यांनी सेंद्रीय शेती करण्याची तयारी दाखविली. यावेळी करंजीच्या सरपंच नसिम रफिक शेख, सुनिल साखरे, रफिक शेख, उपसरपंच शरद अकोलकर, छगनराव क्षेत्रे, मच्छिंद्र गाडेकर, महादेव गाडेकर, राजेंद्र पाठक आदी उपस्थित होते.