कोरोनासोबत मलेरिया, डेंग्यू ठरणार ‘ताप’दायक; सरकारी यंत्रणा, जिल्हा हिवताप कार्यालय सतर्क
By अनिल लगड | Published: June 17, 2020 01:02 PM2020-06-17T13:02:45+5:302020-06-17T14:54:01+5:30
यंदाचा पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात कीटकजन्य जीव मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुणियासारखे आजार बळावण्याचा धोका वाढला आहे. त्यामळे प्रत्येक नागरिकांनी कोरोनासोबत आता इतर आजारांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे.
अहमदनगर : यंदाचा पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात कीटकजन्य जीव मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुणियासारखे आजार बळावण्याचा धोका वाढला आहे. त्यामळे प्रत्येक नागरिकांनी कोरोनासोबत आता इतर आजारांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे.
पावसाळा सुरू झाला की कीटकांची उत्पत्ती होते. या कीटकापांसून हिवताप, डेंग्यू, चिकनगुणिया, हत्तीरोग आजार दरवर्षी मोठ्या प्रमाणात बळावतात. या रोगांपासून अनेक जणांना जीवही गमवावा लागतो. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत, महापालिका पातळीवर पावसाळ्यात स्वच्छतेबाबत काळजी घेतली जाते.
डेंग्यू हा एडिस एजिप्सी डासापासून होते. या डासांच्या दूषित मादीने चावा घेतल्यानंतर डेंग्यू तापाची लक्षणे आढळतात. कोणत्याही व्यक्तीला डेंग्यू होऊ शकतो. मात्र प्रामुख्याने लहान मुलांना संसर्गाचा धोका अधिक असतो. नगर जिल्हा सामान्य रुग्णालयात सेंटीनल सेंटर आहे. येथे डेंग्यूची मोफत तपासणी होते. खासगी रुग्णालयातही या रोगाचे निदान केले जाते. खासगी रुग्णालयातील रॅपीड कीटमध्ये ९५ टक्के निदान होते. तर चिकनगुण्यासाठी पुणे येथील राष्टÑीय विषाणू संस्थेत रक्तजल तपासणीसाठी रक्तनमुने पाठविले जातात. ज्या भागात या आजारांचा उद्रेक आहे. त्या भागात नियमित ताप सर्वेक्षण, हिवताप रक्तनमुने घेऊन प्रयोगशाळेला पाठविणे.
रुग्ण दूषित आढळल्यास रुग्णास उपचार करणे. डेंग्यू संवेदनशील गावात धूर फवारणी करणे. कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करणे, डासोत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडणे, ताप रुग्णाचे रक्तजल नमुने घेणे. तत्काळ सेंटीनल सेंटरकडून तपासणी करुन घेणे, कंटेनर सर्वेक्षण करणे, दूषित कंटेनर रिकामे करणे, त्यात अॅबेट द्रावण टाकणे, आरोग्य शिक्षणाव्दारे जनजागृती करण्याचे काम जिल्हा हिवताप कार्यालयाकडून करण्यात येते, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रजनी खुणे यांनी सांगितले.
रोगाची लक्षणे अशी..
तीव्र ताप, अंगदुखी, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, अंगावर पुरळ येणे, सांधेदुखी, शरीरातील पेशी कमी होणे, नाकातून, हिरड्यातून रक्तस्त्राव होणे.
हिवताप रक्त तपासणी
राष्टÑीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत नगर जिल्ह्यात सन २०१७ मध्ये ६ लाख २१ हजार २८९ रक्तनमुने तपासले. यातील १३ हिवताप रुग्ण आढळले. २०१८ मध्ये ६ लाख २४ हजार ८९५ रक्तनमुने तपासले. यात ११ रुग्ण आढळून आले. २०१९ मध्ये ४ लाख ८२ हजार १३२ रक्तनमुने तपासले. त्यात फक्त २ रुग्ण आढळले. एप्रिल २०२० मध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान १ लाख ५३ हजार ९४४ रक्तनमुने संकलित करण्यात आले. त्यात फक्त दोनच रुग्ण हिवतापाचे आढळून आले आहेत.
तीन वर्षात ५८९ डेंग्यूचे रुग्ण
४सन २०१७-३६५ रक्तनमुने-७८ रुग्ण आढळले. एकाचा मृत्यू. २०१८-६१५ रक्तनमुने-१४५ रुग्ण आढळले. २०१९-१४४० रक्तनमुने-३५९ रुग्ण आढळले. २०२०-जानेवारी ते मार्च ४९ रक्त नमुने-७ रुग्ण आढळले.
चिकणगुणिया तपासणी
२०१७-७, २०१८-२५, २०१९-९, २०२०-८ रुग्ण आढळून आले आहेत.
सर्व नागरिकांनी कोरोनाच्या आजाराकडे लक्ष द्यावे. पण, इतर आजारांकडेही लक्ष ठेवावे. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकसहभागातून नायनाट करणे हाच प्रमुख उद्देश आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकणगुणिया यासारखे आजाराला प्रतिबंध बसतो. याबाबत कार्यालयाकडून उपाययोजना सुरू आहेत.
-डॉ.रजनी खुणे, जिल्हा हिवताप अधिकारी, अहमदनगर.