मलेशियातील भाविकांची साईदरबारी हजेरी; संस्थानकडून भाविकांचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 01:48 AM2019-12-05T01:48:15+5:302019-12-05T01:48:27+5:30
मलेशियातील भाविक एस. पी. कन्नन हे १९८७ पासून शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता येतात.
शिर्डी : शिर्डी साईबाबा सोसायटी आॅफ मलेशिया व वर्ल्ड शिर्डी साईबाबा संस्था लंडन या संस्थेद्वारे मलेशिया, लंडन व मॉरिशस येथून आलेल्या ४९ साईभक्तांनी साईबाबांच्या समाधीचे बुधवारी दर्शन घेतले़ संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी त्यांचे स्वागत करुन सत्कार केला.
मलेशियातील भाविक एस. पी. कन्नन हे १९८७ पासून शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता येतात. संपूर्ण मलेशियात १०० हून अधिक साईबाबांची प्रार्थना स्थळे, तर २२ साईमंदिरे आहेत. यामध्ये क्वालालंपूर, जोहर बहरु, पेनांग येथील साईमंदिरे सर्वात मोठी असून तेथे शिर्डी साईमंदिराप्रमाणे चारही वेळच्या आरत्या, प्रसाद भोजनही दिले जाते. मलेशिया सरकारने बोटॅनिक क्लँग येथे अर्धा एकर जागा साईबाबा मंदिराकरीता देऊ केलेली आहे. मलेशियातील ईपोह येथील डोंगरावर १० एकर जागेवर सार्इंची भव्य मूर्ती उभारणार असल्याचेही कन्नन यांनी सांगितले.
श्री. साईबाबा समाधी मंदिरात शिर्डी साईबाबा सोसायटी आॅफ मलेशिया व वर्ल्ड शिर्डी साईबाबा संस्था लंडन यांनी साई सरस्वती संगीत विद्यालय, शिर्डी यांच्या सहकार्याने भजनसंध्या कार्यक्रम केला.