दारूबंदीसाठी माळीबाभूळगावकरांचे पोलिसांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:22 AM2021-09-11T04:22:52+5:302021-09-11T04:22:52+5:30
तिसगाव : माळीबाभूळगाव (ता. पाथर्डी) येथे भरवस्तीत व धार्मिक स्थळाजवळ सुरू असलेली खुलेआम दारूविक्री बंद करावी. यासाठी सरपंच अनिल ...
तिसगाव : माळीबाभूळगाव (ता. पाथर्डी) येथे भरवस्तीत व धार्मिक स्थळाजवळ सुरू असलेली खुलेआम दारूविक्री बंद करावी. यासाठी सरपंच अनिल तिजोरे, उपसरपंच सुनीता जाधव व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनीच याबाबतचा जाहीर ठराव घेतला. त्याच्या लेखी प्रती पाथर्डी पोलिसांना दिल्या.
ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांची भेट घेऊन तक्रारींचा पाढा वाचला. सचिन वायकर म्हणाले, प्रांताधिकारी कार्यालयाच्या मागे हात्राळ पाडळी येथे जाण्यासाठीचा मुख्य रस्ता आहे. जवळच एक धार्मिक स्थळही आहे. भरवस्तीत दारूविक्री केली जाते. शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनीही याच रस्त्याने शाळेत जातात. काही तळीराम नशेत असताना अश्लील वर्तन करतात. त्यामुळे भरवस्तीतील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. तेथील रहिवाशांनी वेळोवेळी याबाबतची समज दिली. परंतु, सार्वत्रिक जाच सुरूच आहे. आता तर तक्रारी केल्याने दमबाजी व बघून घेण्याची भाषा सुरू झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या भावनांचा वेळीच विचार केला जावा, अशी मागणी त्यांनी केली.
ग्रामपंचायत सदस्य गणेश वायकर, रूबाब शेख,सचिन कोलते, माजी सरपंच रशीद शेख, ग्रामस्थ शौकत शेख, अलीम शेख, भास्कर तांबे, शरद कुटे, जमीर शेख, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर, आदींनी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. चव्हाण यांनी थेट कारवाई करू असे आश्वासन दिले.