मामाचा गाव झाला परका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 01:53 PM2020-04-25T13:53:13+5:302020-04-25T13:54:11+5:30
झुकू झुकू झुकू आगीनगाडी.., धुरांच्या रेषा हवेत सोडी.., पळती झाडे पाहूया... मामाच्या गावाला जाऊया... हे गाणं शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की बालगोपाळांना आठवत असे.
पिंपळगाव माळवी : झुकू झुकू झुकू आगीनगाडी.., धुरांच्या रेषा हवेत सोडी.., पळती झाडे पाहूया... मामाच्या गावाला जाऊया... हे गाणं शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की बालगोपाळांना आठवत असे. यंदा मात्र कोरोनामुळे परिक्षा होण्याआधीच सुट्या लागल्या. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून लॉकडाऊनचा कालावधी सुरु आहे. त्यामुळे भाच्यांना मामाच्या गावाला जाता येईना. त्यामुळे घरात बसूनच मामा-मामीचे गुणगान गाण्याची वेळ भाचेमंडळीवर आली आहे.
वार्षिक परीक्षा संपल्यानंतर शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागली की बालगोपाळांना मामाच्या गावाला जाण्याची ओढ लागते. उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेण्याची आतुरतेने वाट पाहणारे बालगोपाल यावर्षी मामाच्या गावाला दुरावल्याची स्थिती निर्माण झाली आहे. सुट्टीमध्ये बरेचसे बालगोपाळ आपल्या जवळच्या नातेवाईक मामा, मावशीकडे जाऊन सुट्टीचा आनंद घेतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे काही वर्गांच्या वार्षिक परीक्षाच रद्द झाल्या. विद्यार्थ्यांना येणारी सुट्टी बद्दल कुतूहल राहिले नाही. लॉकडाऊनमुळे बालगोपाळांचा सुट्टीचा आनंद हिरावून घेतला गेला. बालगोपाळांना घराच्या बाहेर पडणेही मुश्किल झाले. घरातच टीव्ही पाहुन मुले कंटाळली आहेत.