व्यंकटेश पतसंस्थेच्या संचालकांसह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:47 AM2019-07-12T11:47:52+5:302019-07-12T11:49:06+5:30
नेवासा तालुक्यातील सोनई येथील व्यंकटेश पतसंस्थेच्या १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या चालू आर्थिक वर्षात चार लाख २५ हजार ८०३ रुपयांचा गैरव्यवहार आढळून आला.
सोनई : नेवासा तालुक्यातील सोनई येथील व्यंकटेश पतसंस्थेच्या १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या चालू आर्थिक वर्षात चार लाख २५ हजार ८०३ रुपयांचा गैरव्यवहार आढळून आला. याप्रकरणी नेवासा सहकारी संस्थेचे उपलेखा परीक्षक अनिल निकम यांच्या फिर्यादीवरून व्यंकटेश पतसंस्थेच्या संचालकांसह व्यवस्थापकावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. सुनील बंग, उपाध्यक्ष अभय चंगेडीया, संचालक आनंद भळगट, तेजसकुमार गुंदेचा, गोपाल कडेल, सच्चिदानंद कुरकुटे, विकास जेधे, विजय माकोणे, लक्ष्मी राशिनकर, संध्या जोशी, गुंजन भळगट व व्यवस्थापक श्यामसुंदर खामकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
यापूर्वी २ जानेवारी २०१७ रोजी व्यंकटेश पतसंस्थेतील १ कोटी ९३ लाख ७ हजार रूपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी लेखानिरीक्षक शिरीष कुलकर्णी व लेखापाल सोमाणी यांनी ठेवीदारांच्या रकमेच्या फसवणूक प्रकरणी कर्मचारी, पदाधिकारी व संचालक मंडळावर सोनई पोलिसात गुन्हा दाखल केला होता. मात्र या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून केवळ कर्मचाऱ्यांनाच अटक झाली होती. यापैकी दोन कर्मचारी जामिनावर सुटले असून व्यवस्थापक अजूनही अटकेत आहे. मात्र आरोपी पदाधिकारी व संचालकांवर कुठलीही कारवाई झालेली नाही. ठेवीदारांना गेल्या तीन वर्षांपासून ठेवी मिळण्याची अपेक्षा आहे.
ठेवी प्रकरणी तीन वर्षांपासून आम्ही दाद मागत आहोत. या प्रकरणात राज्य शासनाने लक्ष घालावे. आरोपींना कडक शासन करून व आम्हाला आमच्या ठेवी लवकरात लवकर मिळवून द्याव्यात. -संजय भळगट , ठेवीदार, व्यंकटेश पतसंस्था, सोनई