शेतमाल खरेदी केल्यानंतर तत्काळ पैसे देणे बंधनकारक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:20 AM2021-04-11T04:20:57+5:302021-04-11T04:20:57+5:30
कोपरगाव : बाजार समितीच्या प्रशासनाने कोपरगावसह शिरसगाव – तिळवणी उपबाजार समितींमधील सर्वच व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून माल खरेदी केल्यानंतर मालाची पट्टी ...
कोपरगाव : बाजार समितीच्या प्रशासनाने कोपरगावसह शिरसगाव – तिळवणी उपबाजार समितींमधील सर्वच व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून माल खरेदी केल्यानंतर मालाची पट्टी तत्काळ रोख स्वरूपात द्यावी, असा सक्तीचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक तथा सहायक निबंधक सहकारी संस्था एन. जी. ठोंबळ यांनी दिली.
ठोंबळ म्हणाले, शेतकऱ्यांनी कोपरगाव बाजार समितीत व्यापाऱ्यास शेतमालाची विक्री केल्यानंतर विक्रीची रक्कम त्याच दिवशी मिळत नाही. उलट दोन ते तीन महिन्यांच्या पुढच्या तारखा टाकून व्यापारी शेतकऱ्यांना चेक देतात. प्रसंगी त्या तारखेला बँकेत चेक टाकल्यास तो जमा होत नाही. अशा अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी बाजार समितीकडे आल्या होत्या. त्यावर कोपरगाव व शिरसगाव –तिळवणी येथील सर्व कांदा व भुसार मालाचे व्यापारी यांची नुकतीच संयुक्त बैठक घेतली होती. त्यानुसार यापुढे माल खरेदी केल्यास शेतकरी वर्गास कांदा व भुसार शेतमाल विक्रीपट्टीची संपूर्ण रक्कम रोख स्वरूपात शेतमाल विक्रीच्या दिवशीच अदा करावी, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून तसे परीपत्रकदेखील काढले आहे.
.........
.. तर व्यापाऱ्याला लिलावात भाग घेता येणार नाही !
• शेतकऱ्यास शेतमालाच्या पट्टीची रक्कम शेतमाल विक्रीच्या दिवशीच रोख स्वरूपात द्यावी. त्यासाठी बँक बंद अथवा सुट्टीचे कारण चालणार नाही.
• पुढील दिवशी बँका बंद असल्यास अगोदरच्या दिवशी शेतकऱ्यांना रोख पेमेंट देण्याची व्यवस्था करून ठेवावी. शेतकऱ्यांना रक्कम रोख स्वरूपात त्याच दिवशी न दिल्यास व्यापाऱ्यांची खरेदी बंद करण्यात येईल व थकीत रक्कम वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
• अशा व्यापाऱ्याला दुसऱ्या दिवशी होणाऱ्या लिलावात सहभागी होता येणार नाही.
.............