रांगोळी काढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 03:24 PM2021-02-19T15:24:12+5:302021-02-19T15:24:31+5:30
अंगणात रांगोळी काढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीहून आलेल्या दोन चोरट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. १९) सकाळी सव्वा सातच्या सुमारास शहरातील अभिनव नगर येथे घडली. या परिसरातील एका घराबाहेर बसविलेल्या सीसीटिव्हीत हे चोरटे कैद झाले आहेत.
संगमनेर : अंगणात रांगोळी काढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीहून आलेल्या दोन चोरट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. १९) सकाळी सव्वा सातच्या सुमारास शहरातील अभिनव नगर येथे घडली. या परिसरातील एका घराबाहेर बसविलेल्या सीसीटिव्हीत हे चोरटे कैद झाले आहेत.
नवीन नगर रस्ता संगमनेर बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर आहे. येथील अभिनव नगरमध्ये अरूंधती विजय रेंघे यांचे घर आहे. त्या कुटुंबासमवेत तेथे राहतात. सेवानिवृत्त मुख्याध्यापिका असलेल्या रेंघे या सकाळी सव्वा सातच्या सुमारास अंगणात रांगोळी काढत होत्या. रांगोळी काढून झाल्यानंतर त्या घरात जात असताना दुचाकीहून आलेल्या दोघा चोरट्यांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडत त्यांना जोराचा धक्का दिला. त्यानंतर हे चोरटे नवीन नगर रस्त्याकडे गेले. काही क्षणात हा प्रकार घडल्याने रेंघे गोंधळून गेल्या. त्यांच्या मानेला जखम झाली आहे. रेंघे यांची मुलगी ॲड. मृदुला बंदिष्टे यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांना घडला प्रकार फोनद्वारे कळविला.
देशमुख यांनी अभिनव नगर येथे भेट दिली. चोरटे कैद झालेले सीसीटिव्हीतील फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. साधारण सव्वा तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असल्याचे रेंघे यांनी सांगितले. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.