मंगळसूत्र चोरांचा उच्छाद
By Admin | Published: September 4, 2014 11:12 PM2014-09-04T23:12:04+5:302023-09-29T17:50:39+5:30
अहमदनगर : एकाच दिवसात सात महिलांच्या अंगावरील पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी हिसकावून नेले
अहमदनगर : श्री. गणेशोत्सवासाठी चौका-चौकात पोलीस बंदोबस्त असुनही एकाच दिवसात अवघ्या एक तासामध्येच सात महिलांच्या अंगावरील पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी हिसकावून नेले आहेत. रस्त्यावरील अंधाराचा फायदा घेऊन बुधवारी (दि. ३) सायंकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे सावेडीत एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या डोळ््यात धूळफेक करीत दोघा चोरट्यांनी दुचाकीवरून येत सावेडी परिसरात धुमाकू ळ घातल्याने पोलिसांनाही मान खाली घालावी लागली.
बुधवारी महालक्ष्मी-गौरीचा सण उत्साहात साजरा झाला. यानिमित्त हळदी-कुंकासाठी महिला सोन्याचे दागिने घालून बाहेर पडल्या होत्या. तीच संधी चोरट्यांनी साधली. पाईपलाईन रोड, गुलमोहोर रोड, भिडे हॉस्पिटल चौक, सोनानगर, भिस्तबाग चौक, स्वीट होम परिसर, एकविरा चौक आदी ठिकाणी सोन्याचे दागिने लंपास केली आहेत. एकाच पल्सर गाडीवरून दोन जणांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास सावेडीत धुमाकूळ घातला. पहिली चोरी साडेसहा वाजता झाली. त्यानंतर एकामागून एक महिलांचे दागिने चोरीला गेले. एका महिलेच्या गळ््यातील साडे तीन तोळे सोने, एका महिलेच्या गळ््यातील सोन्याचे बालाजीचे लॉकेट चोरीला गेले. दोन महिलांनी त्यांच्या मंगळसुत्राला पिना लावल्या असल्याने अर्धेच मंगळसूत्र चोरट्यांच्या हाती लागले, तर एका महिलेने चोरट्यांचा मुकाबला करीत मंगळसूत्र वाचविले. बुधवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी महिलांची गर्दी झाली होती.
गणेशोत्सवासाठी चौका-चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच शहरात पेट्रोलिंग वाढविण्यात आली आहे. तरीही पोलिसांच्या डोळ््यात धूळफेत करीत चोरट्यांनी सात महिलांच्या अंगावरील सोन्याची दागिने चोरीला गेल्याने सावेडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यात आमची कैफीयत कोणी ऐकत नव्हते, असा आरोपही फिर्यादी महिलांनी केला आहे. दरम्यान एका गुन्ह्याच्या तपासासाठी जामखेड येथे गेलो होतो. मात्र पोलिसांनी परिस्थिती चांगली हाताळली. मंगळसूत्र गेल्याची माहिती मिळताच सावेडीतील सर्व चौकात नाकाबंदी करण्यात आली होती, असे तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक लक्ष्मण काळे यांनी सांगितले.
चोरट्यांच्या शोधासाठी दोन पथके तातडीने तैनात करण्यात आली आहेत. तसेच सावेडी भागात नाकाबंदी करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत आरोपीला अटक केले जाईल. महिलांनी मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने घालून एकटे घराबाहेर पडू नये. मंगळसूत्राला पीन लावावी. रस्त्यावर असलेल्या अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी गंठण लंपास केले आहेत. चोरी झालेल्या ठिकाणी पथदिवे बंद अवस्थेत आहेत. महिलांच्या अंगावरील चोरीला गेलेले दागिने सुमारे पाच लाख रुपये किमतीचे होते,
- वाय.डी.पाटील,डीवायएसपी
यांचे लुटले सोने
मनीषा दिलीप गालम (रासनेनगर) - साडेतीन तोळे
शारदालक्ष्मी नरेश कोंडगडप्पा (रा. गणेश कॉलनी)-दोन तोळे
शीतल राजेंद्र वाघ ( गुरुकृपा, सावेडी) - साडे तीन तोळे
डॉ. कुमुदिनी कल्याण भोसले (दूरसंचार वसाहत)- एक तोळा
कविता पराग गुंजकर (रा. भिस्तबाग चौक)- तीन तोळे
शोभा सुरेंद्र रोहाटिया (रा. ऐश्वर्यानगर)- तीन तोळे
श्रीमती मुसळे- एक तोळा