नगर जिल्ह्यात तौक्ते वादळाचा आंबा बागांना सर्वाधिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:21 AM2021-05-21T04:21:11+5:302021-05-21T04:21:11+5:30

अहमदनगर : तौक्ते चक्रीवादळाचा फटका रविवारी रात्री व सोमवारी दिवसभर जिल्ह्यातील बहुतांश भागाला बसला. ठिकठिकाणी झाडे उन्मळली. कांदा उत्पादक ...

Mango orchards hit hardest in Nagar district | नगर जिल्ह्यात तौक्ते वादळाचा आंबा बागांना सर्वाधिक फटका

नगर जिल्ह्यात तौक्ते वादळाचा आंबा बागांना सर्वाधिक फटका

अहमदनगर : तौक्ते चक्रीवादळाचा फटका रविवारी रात्री व सोमवारी दिवसभर जिल्ह्यातील बहुतांश भागाला बसला. ठिकठिकाणी झाडे उन्मळली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचीही धांदल उडाली. या वादळाचा सर्वाधिक फटका आंबा बागांना बसला. जिल्हाभर पाचशे हेक्टरहून अधिक आंबा बागांमध्ये जोरदार वाऱ्यामुळे कैऱ्यांचा सडा पडला होता. जिल्ह्यातील बहुतांश भागात रात्रीपासून दिवसभर वीजही गायब होती.

शनिवारी रात्रीपासूनच नगर शहरासह जिल्ह्यात जोरदार वारे वाहत होते. सोमवारी वाऱ्याचा वेग कमालीचा वाढला. दिवसभर हा वेग ताशी ५० ते ६० किमीपर्यंत पोहोचला होता. वादळाने नेवासा, पारनेर, नगर, कर्जत, जामखेड, शेवगाव, श्रीगोंदा, कोपरगाव, राहुरी आदी तालुक्यांमध्ये आंबा बागांना मोठा फटका बसला. या भागांतील पाचशे हेक्टरहून अधिक आंबा बागांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळली.

सोमवारी चक्रीवादळाच्या रौद्ररूपामुळे जिल्ह्यातील २५ वीज उपकेंद्रे, ३४४ वीज वाहिन्यांचा, ९ हजार ३४१ रोहित्र आणि ५५२ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. काही भागांतील वीजपुरवठा सुरक्षेसाठी बंद करण्यात आला होता. अनेक ठिकाणी झाडे, झाडाच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडल्या होत्या. वीजवाहक तारा तुटल्याने काही भागात वीजपुरवठा बंद झाला होता. बंद पडलेली सर्वच २५ विद्युत उपकेंद्रे, ३३८ वीज वाहिन्यांचा, ९ हजार ६३ रोहित्र आणि ५४५ गावांचा विद्युत पुरवठा मंगळवारी दुपारपर्यंत सुरू करण्यात महावितरणला यश आले होते.

...............

सहा म्हशी दगावल्या

नगर शहरापासून जवळ असलेल्या भिंगार येथे कानडे मळ्यात वादळामुळे विजेची तार नाल्यात पडली. त्यामुळे नाल्यात वीजप्रवाह उतरला होता. यावेळी म्हशी नाल्यावर पाणी पिण्यासाठी आल्या होत्या. पाणी पिताना विजेचा धक्का बसून सहा म्हशी दगावल्या. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.

---

फोटोओळ

देवदैठण (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) येथील आंबाबागेत कैऱ्यांचा पडलेला सडा.

-----

Web Title: Mango orchards hit hardest in Nagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.