मांजरसुंबा ग्रामस्थांनी उचलला पर्यावरण रक्षणाचा विडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:16 AM2021-06-26T04:16:02+5:302021-06-26T04:16:02+5:30
पिंपळगाव माळवी : वटपौर्णिमा सणाचे औचित्य साधून नगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथे गावातील ज्येष्ठ दाम्पत्य इंद्रभान कदम व ...
पिंपळगाव माळवी : वटपौर्णिमा सणाचे औचित्य साधून नगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथे गावातील ज्येष्ठ दाम्पत्य इंद्रभान कदम व सोनाबाई कदम यांच्या हस्ते पाच वटवृक्षाची लागवड करून वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा करण्यात आला. येथील ग्रामस्थांनी पर्यावरण रक्षणाचा विडा उचलला आहे.
वटपौर्णिमा सणापासून येणाऱ्या काळात गावात शंभर वटवृक्ष व घरोघरी एक आंब्याचे झाड लागवडीचा निश्चय ग्रामस्थांनी केला आहे.
नुकत्याच संपलेल्या काेरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत रूग्णांचे ऑक्सिजन अभावी झालेले हाल पाहून मांजरसुंबा गावांनी एक निश्चय केला आहे. गाव हरित करण्याचा विडा वटपौर्णिमेच्या निमित्ताने उचलला आहे. डोंगरगण येथील पुणे स्थित उद्योजक भाऊसाहेब पठारे यांनी डोंगरगण व मांजरसुंबा या दोन्ही गावांसाठी वटवृक्ष व आंब्याचे वृक्ष दान केले.
गावातील प्रत्येक ग्रामस्थ आपल्या घरापुढे खड्डे खणून या वृक्षाची लागवड करून त्याची निगा राखणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात हे गाव हरित गाव होणार असून पर्यटनदृष्ट्या या गावाचा विकास होण्यास हातभार लागणार आहे.
यावेळी सरपंच मंगल कदम, उपसरपंच जालिंदर कदम, सावळेराम कदम, पांडुरंग कदम, भाऊ कदम, बाबासाहेब नालकर, राजू पटारे, राजू भूतकर, ज्ञानेश्वरी कदम, राहुल कदम व ग्रामस्थ उपस्थित होते.
----
२५ मांजरसुंभा
आदर्शगाव मांजरसुंबा येथे ज्येष्ठ दाम्पत्याच्या हस्ते वटवृक्षाची लागवड करून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.