मनोज कोतकर यांनी आपला पक्ष जाहीर करावा, अन्यथा कारवाईस सामोरे जावे- अभय आगरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:55 PM2020-09-28T12:55:50+5:302020-09-28T12:56:37+5:30
महानगरपालिकेत ऐनवेळी पक्ष बदलून सभापती झालेले मनोज कोतकर यांनी ते कोणत्या पक्षात आहेत हे जाहीर करावे. अन्यथा पक्षविरोधी कारवाईसाठी सामोरे जावे, असे स्पष्ट मत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी व्यक्त केले आहे.
अहमदनगर : महानगरपालिकेत ऐनवेळी पक्ष बदलून सभापती झालेले मनोज कोतकर यांनी ते कोणत्या पक्षात आहेत हे जाहीर करावे. अन्यथा पक्षविरोधी कारवाईसाठी सामोरे जावे, असे स्पष्ट मत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी व्यक्त केले आहे.
या संदर्भात त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनाही निवेदन दिले आहे. महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदाची नुकतीच निवड झाली. राज्यातील सत्तेत असलेली आघाडी अन् महापालिकेतील आघाडी यात फरक आहे. त्यावेळी शिवसेनेला महापालिकेत सत्तेपासून दूर ठेवणे ही काहींची गरज होती. त्यातून महापालिकेतील सत्ताधारी आघाडी जन्माला आली. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या राजकारणात राज्यभर आशा आघाड्या होत असतात. त्यामुळे येथे झाले ते फार काही वेगळे नाही. शिवाय राज्यात त्यावेळी भाजपची सत्ता होती. या सत्तेच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासासाठी निधी मिळेल, म्हणून हा निर्णय घेतल्याचे त्यावेळी नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. राजकीय अपरिहार्यतेबरोबरच विकासाचा एक दृष्टिकोन यामागे होता. विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी देखील दिला. सत्तेसाठी एकत्र येणे याचा अर्थ भाजपने स्वत:ची फरफट करून घ्यावी असा नाही, असेही आगरकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
स्थायी समिती सभापती निवडणूक पक्षासाठी महत्वाची असली तरी पक्षाची प्रतिमा पणाला लावण्याएवढी निश्चितच मोठी नाही. सत्तेपेक्षा प्रतिमा जपण्यास भाजपने नेहमीच प्राधान्य दिले आहे. या निवडणुकीमुळे पक्षाच्या प्रतिमेवर प्रश्न उपस्थित करणा-यांची तोंडे बंद करावे लागतील. त्यामुळे कोतकर यांनी वेळीच वस्तुस्थिती समोर मांडून स्वत: वरील कारवाई टाळावी. त्यांना महाविकास आघाडीशी सोयरीक करायची असेल तर खुशाल करावी. मात्र पक्षाने त्यांच्यावर पक्षशिस्त भंग अन् पक्षांतर यावरून कारवाई सुरू करावी, अशी मागणी आगरकर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली आहे.