कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी श्रीगोंदा तालुक्यात राबताहेत अनेक हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:20 AM2021-04-25T04:20:19+5:302021-04-25T04:20:19+5:30
श्रीगोंदा : कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी तालुक्यात अनेक हात राबत आहेत. त्यातच ऑक्सिजन अपुरा पडणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी बाजार समितीचे माजी ...
श्रीगोंदा : कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी तालुक्यात अनेक हात राबत आहेत. त्यातच ऑक्सिजन अपुरा पडणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा हे स्वत: रात्री-बेरात्री धावपळ करीत आहेत. त्यांना ऑक्सिजन मिळवून देऊन प्राण वाचवीत आहेत. याशिवाय घारगाव येथील कोविड सेंटरमध्ये दोघा डॉक्टरांनी रुग्णसेवा सुरू केली आहे. याशिवाय इतरही अनेक तरुणांनी रुग्णसेवेत झोकून दिले आहे.
लोणी व्यंकनाथ येथे बाळासाहेब नाहाटा यांनी कोविड सेंटर सुरू केले आहे. येथे ८६ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांना सर्व प्रकारची सेवा मोफत दिली जात आहे. याशिवाय तालुक्यातील एकाही रुग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होऊ नये यासाठी नाहाटा यांनी संकल्प केला आहे. ते खासगी अथवा सरकारी रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर पोहोच करीत आहेत. रात्री-बेरात्री कधीही कोणाचाही फोन आला तरी नाहाटा छाेटा टेम्पो घेऊन ऑक्सिजन सिलिंडर मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. नुकताच त्यांनी श्रीगोंदा येथील एका रुग्णाचा असाच रात्री धावपळ करून प्राण वाचविला.
घारगाव येथील डॉ. चंद्रशेखर कळमकर व डॉ. विनायक शिंदे यांनी स्वत:चे दवाखाने बंद करून घारगाव येथीलच कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवेचे काम अविरतपणे सुरू केले आहे. त्यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्णांना आधार मिळाला आहे. येथील कोविड सेंटरमध्ये ३५ रुग्ण आहेत. गावकऱ्यांनी कोविड सेंटरला सहमती दिली आणि डॉ. कळमकर व डॉ. शिंदे यांनी खांद्यावर धुरा घेतली.
--
वैद्यकीय सेवेतून जीवनात सर्वकाही मिळाले. मात्र, सध्या कोरोनामुळे गोरगरीब रुग्णांचा पैसा आणि ऑक्सिजन बेडअभावी जीव जाऊ लागले आहेत. हे पाहून मन सुन्न झाले. ही माणसे जगली तरच आपल्या जगण्याला अर्थ आहे याच भावनेतून कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवा सुरू केली आहे.
डॉ. चंद्रशेखर कळमकर,
घारगाव
----
घारगाव कोविड १, घारगाव कोविड २
बाळासाहेब नाहाटा हे रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर मिळविण्यासाठी स्वत: छोटा टेम्पो चालवितात. दुसऱ्या छायाचित्रात घारगाव येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवा करणारे डॉ. चंद्रशेखर कळमकर व डॉ. विनायक शिंदे.