सोशल मीडिया घालतोय अनेकांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:20 AM2021-02-10T04:20:20+5:302021-02-10T04:20:20+5:30
नागरिकांच्या व्हॉटस्ॲप क्रमांकांवर अनोळखी क्रमांकाहून २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचा संदेश येतो. त्यात रेकॉर्ड केलेला ऑडिओ असतो. त्यात लॉटरीचे ...
नागरिकांच्या व्हॉटस्ॲप क्रमांकांवर अनोळखी क्रमांकाहून २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचा संदेश येतो. त्यात रेकॉर्ड केलेला ऑडिओ असतो. त्यात लॉटरीचे २५ लाख रुपये कोठून मिळणार, ते कोण देणार, याबाबत माहिती असते. बोलणारी व्यक्ती व्हॉटस्ॲपकडून बोलत असल्याचे सांगितले जाते. हा इंटनरनॅशनल लकी ड्रॉ असून, मुंबईतील भारतीय स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांचा क्रमांक आपल्याला पाठविला आहे. या अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यास तुम्हाला २५ लाख रुपये मिळतील. संपर्कासाठी एक क्रमांक दिला जातो. त्यावर केवळ व्हॉटस्ॲप कॉलच करावा लागेल, असे सांगण्यात येते. भारतीय राजमुद्रेचा शिक्का, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिक्का, कौन बनेगा करोडपती व काही खासगी चॅनलचे लोगो, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी यांचे फोटोदेखील संबंधित संदेशासोबत असतात. त्याखाली १५, नेताजी सुभाष सडक, कोलकाता, ७०० ००१, भारत, असा पत्ता दिलेला असतो. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर अनेकांना हा संदेश खरा वाटतो. त्यामुळे खरोखर आपण २५ लाख रुपये जिंकलाे असल्याचा त्यांचा समज होतो. दिलेल्या क्रमांकावर व्हॉटस्ॲप कॉल केल्यानंतर नागरिकांना त्यांचे बँक खाते, आधार, पॅन कार्ड याची माहिती मागविली जाते. नागरिकांना बोलण्यात भाळवून त्यांना काही पैसे भरण्यास सांगितले जाते. पैसे भरल्याची खात्री करण्यासाठी बँकेत पैसे भरल्याची पावती पाठविण्यास सांगण्यात येते.
हे पैसे सायबर भामट्यांना मिळाल्यानंतर काही दिवसांत तुमच्या बँक खात्यावर २५ लाख रुपये जमा होतील. याबाबत खात्री देण्यात येते. मात्र, अनेक दिवसांनंतरही पैसे न आल्याने फसवणूक झाल्याचे नागरिकांच्या लक्षात येते. याबाबत काही जण सायबर सेलकडे, पोलीस ठाण्यात तक्रारी करतात. काही जण याबाबत कुठेही तक्रार करत नाहीत.
------
कोट
नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या फसवणुकीला बळी पडू नये. फसवणूक झाल्यास पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. तात्काळ तक्रार दिल्यास गुन्हेगारांना पकडणे सोपे जाते. अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या तपास पोलिसांनी लावला आहे.
-राहुल मदने, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर