मराठा आंदोलन मागे, एसटी सेवा सुरळीत
By चंद्रकांत शेळके | Published: November 2, 2023 08:53 PM2023-11-02T20:53:34+5:302023-11-02T20:54:02+5:30
Ahmednagar: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेले उपोषण मागे घेतल्याने गेल्या चार दिवसांपासून बंद असलेली एसटी सेवा गुरूवारी रात्रीपासून सुरूळीत झाली.
- चंद्रकांत शेळके
अहमदनगर - मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेले उपोषण मागे घेतल्याने गेल्या चार दिवसांपासून बंद असलेली एसटी सेवा गुरूवारी रात्रीपासून सुरूळीत झाली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरू होते. त्यांच्या समर्थनार्थ मराठवाड्यासह अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान, सोमवारी (दि. ३० ॲाक्टोबर) मराठवाड्यात काही एसटी बसची तोडफोड झाल्याने एसटी महामंडळाने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील तसेच बाहेर जाणाऱ्या सर्वच एसटी बस बंद केल्या. गेल्या चार दिवसांपासून बस वाहतूक बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. यात एकट्या अहमदनगर विभागाचे दीड कोटीचे उत्पन्न बुडाले.
दरम्यान, गुरूवारी सायंकाळी मनोज जरांगे यांनी सरकारला २ जानेवारीपर्यंत मुदत देत आपले उपोषण मागे घेतले. त्यामुळे एसटी प्रशासनानेही एसटी वाहतूक सुरळीत करण्याचा निर्णय घेतला. गुरूवारी रात्रीपासूनच काही प्रमाणात फेऱ्या सुरू करण्यात आल्या. शुक्रवारपासून ग्रामीणसह लांब पल्ल्याच्या सर्व फेऱ्या पूर्ण क्षमतेने सुरू होतील, अशी माहिती प्रभारी विभाग नियंत्रक मनोज नगराळे यांनी दिली.
दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बससेवा सुरळीत झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. एसटीचाही हा उत्पन्नाचा काळ असतो. त्यामुळे एसटी अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही या उपोषणाकडे लक्ष लागून होते.