मराठा आरक्षण : बिरेवाडीत राज्य सरकारची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा
By साहेबराव नरसाळे | Updated: October 29, 2023 19:01 IST2023-10-29T19:01:17+5:302023-10-29T19:01:32+5:30
सरकारला दिलेल्या ४० दिवसांच्या मुदतीत आरक्षण न मिळाल्याने जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत.

मराठा आरक्षण : बिरेवाडीत राज्य सरकारची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा
अहमदनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याकरिता सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. रविवारी (दि. २९) संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर परिसरातील बिरेवाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. ही अंत्ययात्रा अमरधाममध्ये नेत तेथे प्रतीकात्मक अंत्यविधी करण्यात आला.
सरकारला दिलेल्या ४० दिवसांच्या मुदतीत आरक्षण न मिळाल्याने जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकार मराठा समाजाला खोटी कारणे देत आहे. त्यामुळे आम्ही सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत अंत्यविधी केला, असे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले.
जरांगे पाटील यांनी पुन्हा सुरू केलेल्या उपोषणाला साकूर पठार भागातील सकल मराठा समाजबांधवांनी पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. तसेच, मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत बिरेवाडीत राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी करत गावातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. संगमनेर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. त्याला पाठिंबा असल्याचे पठार भागातील सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले.