इंग्रजी माध्यमाच्या गठ्ठ्यात मराठीची प्रश्नपत्रिका : झेरॉक्स करुन वाटल्या प्रश्नपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 07:10 PM2019-03-05T19:10:17+5:302019-03-05T19:10:27+5:30
इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकांच्या गठ्यात चक्क मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका पाठविल्यामुळे दहावीच्या बोर्ड परीक्षेत एकच गोंधळ निर्माण झाला़
अहमदनगर : इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकांच्या गठ्यात चक्क मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका पाठविल्यामुळे दहावीच्या बोर्ड परीक्षेत एकच गोंधळ निर्माण झाला़ शेवटी शाळेतच इंग्रजी माध्यमाच्या इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्या अन् अखेर ५० मिनिटे उशीराने परीक्षा सुरु झाली़ हा प्रकार शहरातील रुपीबाई बोरा शाळेत मंगळवारी घडला़
शहरातील रुपीबाई बोरा शाळेत मराठी व इंग्रजी माध्यमाच्या दहावीच्या बोर्ड परीक्षा सुरु आहेत़ दोन्ही पेपरची वेळ एकच आहे़ मंगळवारी मराठी व इंग्रजी माध्यमाचा दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता़ सकाळी ११ वाजता परीक्षा सुरु झाली़ मराठी माध्यमाच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वेळेत पोहोचल्या़ त्यांची परीक्षाही सुरु झाली़ मात्र, इंग्रजी माध्यमाच्या काही वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटप करण्यासाठी पर्यवेक्षकांनी प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पॉकेट फोडले असता आतमध्ये इंग्रजी माध्यमाऐवजी मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका असल्याचे लक्षात आले़ पर्यवेक्षकांनी तात्काळी ही बाब केंद्र प्रमुखांच्या लक्षात आणून दिली़ केंद्र प्रमुखांनी माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांना कळविले़ त्यानंतर पोले पथकासह शाळेत दाखल झाले़ पोले यांनी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाची इंग्रजी या विषयाची प्रश्नपत्रिका गेल्याची खात्री केली़ त्यानंतर त्यांनी शाळेतच इंग्रजी माध्यमाच्या इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना वाटण्यात आली़ तोपर्यंत ५० मिनिटे वेळ वाया गेला होता़ त्यामुळे शिक्षणाधिकारी पोले यांनी इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना ५० मिनिटांचा वेळ वाढून देण्याचा निर्णय घेतला़
इंग्रजी माध्यमाच्या गठ्यात मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका निघाल्यामुळे दहावीची परीक्षा ५० मिनिटे उशीराने सुरु झाली़ त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळ वाढून देण्यात आला होता़ नंतर परीक्षा सुरळीत पार पडली़ घटनेची माहिती मिळताच आम्ही पथकासह रुपीबाई बोरा शाळेत पोहोचलो़
-लक्ष्मण पोले, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग