घोषणांचाच बाजार, फेरीवाल्यांच्या हाती दमडीही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:21 AM2021-05-08T04:21:16+5:302021-05-08T04:21:16+5:30
अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर करत हातावर पोट असणाऱ्यांना दीड हजार रुपये सानुग्रह आनुदानाची घोषणा केली. ...
अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर करत हातावर पोट असणाऱ्यांना दीड हजार रुपये सानुग्रह आनुदानाची घोषणा केली. मदतीची घोषणा होऊन महिना उलटून गेला. मात्र, जिल्ह्यातील फेरीवाल्यांना अद्याप एक दमडीची मदत न मिळाल्याने, फेरीवाल्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत केंद्र सरकारने फेरीवाल्यांना पुन्हा व्यावसाय सुरू करता यावा, यासाठी दहा हजार रुपये तत्काळ कर्ज उपलब्ध करून दिले. हे कर्ज घेऊन फेरीवाल्यांनी पुन्हा व्यावसाय उभे केले, परंतु कोरोनाची दुसरी लाट येऊन धडकली. कोरोनाचे रुग्ण वाढल्याने राज्य सरकारने १५ एप्रिल रोजी कडक निर्बंध लागू केले. त्यामुळे व्यावसाय पुन्हा बंद करावे लागले. हातावर पोट असणाऱ्यांसाठी राज्य सरकारने सानुग्रह आनुदान देण्याची घोषणा केली. राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे आपल्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा होतील, अशी अशा फेरीवाल्यांना होती. मात्र, महिनाभराचा कालावधी उलटून गेला, परंतु अद्यापही फेरीवाल्यांना सरकारची मदत मिळालेली नाही. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या फेरीवाल्यांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
......
जिल्ह्यात एकूण नोंदणीकृत फेरीवाले
६,३३०
....
महापालिकेला आदेशच नाहीत
राज्य सरकारने फेरीवाल्यांना १,५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली खरी, पण तसा आदेश अद्याप महापालिकेला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे महापालिका स्तरावर या मदतीबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.
.....
- महापालिका, नगरपालिका आणि नगरपरिषद क्षेत्रातील फेरीवाल्यांना १,५०० रुपये सानुग्रह आनुदान जाहीर करण्यात आलेले आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे विचारणा केली असता, आनुदान लवकरच फेरीवाल्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन जमा केले जाणार आहे.
- दत्तात्रय लांघी, जिल्हा प्रशासन अधिकारी
.....
- शासनाने फेरीवाल्यांसाठी दीड हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती, परंतु हे पैसे अजून फेरीवाल्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करून पैसे जमा करावेत, तसेच धान्य वाटप करावे.
- अजय भुजबळ, व्यावसायिक, नगर