जिल्हाभरातील आठवडे बाजार बंद

By Admin | Published: June 4, 2017 03:50 PM2017-06-04T15:50:26+5:302017-06-04T15:50:26+5:30

पारनेर तालुक्यातील पारनेर, अळकुटी, वनकुटे येथील आठवडेबाजार शेतकऱ्यांनी स्वंयस्फुर्तीने बंद ठेवले़

Market closures for weeks | जिल्हाभरातील आठवडे बाजार बंद

जिल्हाभरातील आठवडे बाजार बंद

अहमदनगर : शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाभरातील रविवारचे आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले़ पारनेर तालुक्यातील पारनेर, अळकुटी, वनकुटे येथील आठवडेबाजार शेतकऱ्यांनी स्वंयस्फुर्तीने बंद ठेवले़
राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपामध्ये पारनेरमध्ये रविवारीही उत्स्फुर्तपणे शेतकरी सहभागी झाले होते़ रविवारी पारनेर शहरातील आठवडे बाजारात शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणलाच नाही़ यामुळे बाजारात सकाळपासूनच शुकशुकाट होता़ पारनेर शहर व परिसरातील ग्राहक भाजीपाला आणण्यासाठी आले होते़ मात्र त्यांना रिकाम्या पिशव्या घेऊन परतावे लागले. शेतकऱ्यांनी उत्स्फुर्तपणे बाजार बंद केल्यानंतर बाहेरीला व्यापाऱ्यांनी शेतमाला व्यतिरिक्त इतर वस्तु विक्रीसाठी आणल्या होत्या़ मात्र, शेतकऱ्यांचाच माल विक्रीला नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांनाही माल विकू दिला जाणार नाही, असा पावित्रा योगेश मते, बाळासाहेब मते, दिपक नाईक, महेंद्र मगर, धीरज महांडुळे, दादा शेटे, मंदार नाईक, रायभान औटी, मंगेश कानडे, बाबासाहेब चेडे, संदीप कावरे आदींनी घेतला़ त्यामुळे व्यापाऱ्यांनीही आणलेला माल परत नेला़
संपामुळे कोरडगाव, खरवंडीतील बाजार बंद
शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पाथर्डी तालुक्याच्या पूर्वभागातील कोरडगाव व खरवंडीकासार येथील आठवडे बाजार तसेच दुध संकलन केंद्र बंद ठेवण्यात आले. बाजारपेठांमध्ये फळे, भाजीपाल्यांची आवक बंद झाली आहे.
कोरडगाव येथे डायनामिक्स, रिलायन्स, प्रभात तसेच तालुका दुधसंघाचे संकलन केंद्र असुन येथे दर दिवशी सुमारे चार हजार लिटर दुधाचे परिसरातून संकलन होते. याची दुध व्यवसायावर मोठी आर्थिक उलाढाल अवलंबुन आहे. सदर संकलन केंद्र बंद असल्याने आर्थिक उलाढाल ठप्प झाली. कोरडगाव येथील शेतकऱ्यांनी दुध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला. राष्ट्रीय महामार्गावर खरवंडी ही महत्वाची बाजारपेठ आहे. येथील बाजार बंद असल्याने सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले. शेतकरी भाजीपाला जनावरांना चारा म्हणून देत आहे. दुधापासुन दुग्धजन्य पदार्थ बनविले जात आहेत.
विसापूर येथील आठवडे बाजार बंद
संपाबाबत विसापर परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. संप मागे न घेता संपाला पाठींबा चालू ठेवण्यासाठी विसापूर येथील आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला. प्रत्येक रविवारी विसापूर येथे आठवडे बाजार भरत असतो. रविवारी नेहमीप्रमाणे आठवडे बाजारात व्यापाऱ्यांनी माल विक्रीसाठी आणला होता़ मात्र, शेतकरी संप असल्याचे कळताच व्यापाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला़ सरकारने जयाजी सुर्यवंशी यांना हाताशी धरुन शेतकऱ्यांचा संप मोडीत काढण्याचा प्रयत्न केला़ शेतकऱ्यांना सरकारची भुमिका मान्य नसल्याने सोमवारी महाराष्ट्र बंदला पाठींबा देण्यासाठी कोळगाव व विसापूर परिसरातील गावांमध्ये व्यवहार बंद राहणार आहेत.

Web Title: Market closures for weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.