यंदा होऊन जाऊ द्या, शुभमंगल सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2022 01:10 PM2022-11-08T13:10:55+5:302022-11-08T13:11:23+5:30
२६ नोव्हेंबरपासून २८ जून २०२३ पर्यंत लग्नाचे तब्बल ५७ मुहूर्त आहेत.
अहमदनगर : दोन वर्षांपासून बंद असलेला लग्न समारंभातील थाटमाट पुन्हा सुरू झाला आहे. यंदा २६ नोव्हेंबरपासून विवाह मुहूर्त असले तरी तुळशीविवाह सुरू होताच नगरमध्ये विवाह समारंभ धूमधडाक्यात सुरू झाले आहेत. वधू-वरांच्या पित्यांकडून मंगल कार्यालये आरक्षित झालेली आहेत. डीजे, घोडा, आचारी, केटरर्स, विद्युत रोषणाई यासाठी आवश्यक नियोजन केले आहे. २६ नोव्हेंबरपासून २८ जून २०२३ पर्यंत लग्नाचे तब्बल ५७ मुहूर्त आहेत.
पंचांगानुसार लग्नतिथी
महिना - लग्नतिथी
नोव्हेंबर २६, २७, २८, २९
डिसेंबर २, ४, ९,१४, १६, १७, १८
जानेवारी (२०२३) १८, २६, २७, ३१
फेब्रुवारी ६, ७, १०, ११, १४, १६, २२, २३, २४, २७, २८
मार्च ८, ९, १३, १७, १८
मे २, ३, ४, ७, ८, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २९, ३०
जून १, ३, ७, ८, ११, १२, १३, १४, २३, २६, २७, २८
(गुरुचा अस्त असल्याने यंदा एप्रिलमध्ये मुहूर्त नाहीत.)
तुळशीचे लग्न यंदा चार दिवस
दिवाळी झाल्यानंतर कार्तिक शुद्ध एकादशी येते. तुळशीविवाह सुरू झाले आहेत. ४,५,६ आणि ७ नोव्हेंबर यादरम्यान तुळशीविवाह आहे. मंगळवारी (दि. ८) खंडग्रास चंद्रग्रहण आहे. तसेच पौर्णिमा दुपारी ४.३१ पर्यंतच आहे. तुळशीविवाह सुरू झाले की विवाह मुहूर्त सुरू होतात.
सहा महिने आधीच मंगल कार्यालयांचे बुकिंग
कोरोना अथवा इतर कोणतेही निर्बंध नसल्याने वर-वधू पक्षाकडून लग्नाचे नियोजन मागील काही महिन्यांपासून सुरू होते. काही यजमान कुटुंबांनी मंगल कार्यालयासह आचारी, केटरिंग, इतर व्यवस्थेची बुकिंग केली आहे.
आचाऱ्यापासून घोडावाल्यापर्यंत जुळवाजुळव
यंदा जूनपर्यंतच जवळपास लग्नाचे ५० पेक्षा जास्त मुहूर्त असले तरी लग्न सोहळ्याची संख्यादेखील जास्त राहणार आहे. घरातील मंगल कार्यालयाच्या वेळी लागणारे आचारी, केटरर्स,लग्नपत्रिका, घोडेवाला,बँड, इव्हेंट मॅनेजमेंट सेवेदारांशी संपर्क करून आवश्यक ती जुळवाजुळव करण्यावर भर दिला जात आहे.
यावर्षी दसऱ्यापासूनच सोने गत काही महिन्यांच्या तुलनेत स्वस्त होते. तसेच दिवाळीनंतर सोने महाग होईल की काय अशी शक्यता असल्याने अनेकांनी पितृपक्ष, दसरा-दिवाळीपूर्वीच सोने खरेदी केली आहे. त्यामुळे मुहूर्ताच्या खरेदीसोबतच लग्नासाठी आवश्यक दागिन्यांची खरेदी केली आहे.