शेवगावात मंगल कार्यालयांची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:32 AM2021-02-23T04:32:00+5:302021-02-23T04:32:00+5:30
शेवगाव : गत दहा दिवसात नऊ कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने तालुका प्रशासनाने खबरदारी म्हणून युद्धपातळीवर तयारी सुरू केली ...
शेवगाव : गत दहा दिवसात नऊ कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने तालुका प्रशासनाने खबरदारी म्हणून युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणारे, मंगल कार्यालय तपासणीसाठी पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. वेळ पडल्यास डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू करण्यात येईल, असे तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सांगितले.
तहसीलदार स्वतः आजारी असतानाही फोनवरून प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून सूचना देत आहेत. काही महिन्यांपूर्वी कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर येथील डेडिकेटेड सेंटर बंद करण्यात आले होते. सार्वजनिक ठिकाणी नागरिकही विना मास्क वावरताना दिसून येत होते. ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळीनंतर कोरोना संसर्गाने धुमाकूळ घालण्यास सुरवात केली आहे. तालुक्यात गत दहा दिवसात नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना चाचणी करण्यासाठी अनेकजण खाजगी प्रयोगशाळेत जात आहेत. तिथे पॉझिटिव्ह निघालेल्या रूग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे घेतली जात नव्हती, मात्र शनिवारपासून शहरातील प्रयोगशाळांना दररोज पॉझिटिव्ह रूग्णांचा अहवाल पाठवण्याच्या सुचना देण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर काटे यांनी सांगितले.
डेडिकेटेड कोविड सेंटर सुरु करण्यासाठी वेळप्रसंगी काही इमारती ताब्यात घेतल्या जातील. तसेच मंगल कार्यालय व इतर ठिकाणी होणाऱ्या लग्न सोहळ्याला ५० लोकांना उपस्थित राहता येणार आहे. त्या पेक्षा अधिक लोक उपस्थित राहिल्यास कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे, यासाठी पोलीस व नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आल्याचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी सांगितले आहे.
प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी मंगल कार्यालय व हॉटेल मालकांची बैठक घेतली. सार्वजनिक ठिकाणी विना मास्क वावरणाऱ्या ९८ तर थुंकणारे २ दोघे अशा १०० जणांवर दंडात्मक कारवाई केल्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी सांगितले.