'मास लीडर' मुळे 'मास्क' दुसऱ्यांदा चर्चेत,मास्क घातलेल्या नेत्यांचे फोटो होतायत व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 04:22 PM2020-06-16T16:22:25+5:302020-06-16T16:22:35+5:30
अरुण वाघमोडे अहमदनगर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात 'मास्क' ही वस्तू दुसऱ्यांदा चर्चेचा विषय ठरली आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर ...
अरुण वाघमोडे
अहमदनगर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात 'मास्क' ही वस्तू दुसऱ्यांदा चर्चेचा विषय ठरली आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर सुरुवातीला नगरमध्ये मास्कचा तुटवडा निर्माण झाला होता तेव्हा आणि आता मास्क न घातल्यामुळे आमदार संग्राम जगताप यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे.
सध्या सोशल मीडियावर मास्क न घातलेले नेते आणि मंत्री यांचे फोटो व्हायरल होत आहेत. काही सजग नागरिकांनी तर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक व्हाट्सअपवर मास्क न घातलेल्या नेत्यांचे फोटो सेंट करून यांच्यावरही गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे.
चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारत असताना त्यांनी चेहऱ्याला मास्क घातलेले नव्हते. जगताप यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोतवाली पोलिस ठाण्यात आ. जगताप यांच्यासह इतर 25 ते 30 जणांविरोधात सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर गुन्हा दाखल झाल्याने मास्क हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला.
जगताप यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकारी बैठका घेताना तसेच शहरात विविध ठिकाणी फिरताना मास्क न घातलेल्या नेते, मंत्री आणि कार्यकर्त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. प्रशासनाने यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. दरम्यान सोमवारी आमदार संग्राम जगताप यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांची भेट घेतली. ही भेट मात्र श्रीगोंदा येथील कामासंदर्भात होती असे जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
.......................
आता 'मास्क'बाबत नेते, कार्यकर्ते सतर्क
मास्क न घातल्याने आमदारांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने नगरमधील विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते गेल्या दोन दिवसांपासून घराबाहेर पडतात चेहऱ्याला मास्क घालत आहेत.
.............
सार्वजनिक ठिकाणी
सोशल डिस्टंसिंगचा फज्जा
लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी दररोज सोशल डिस्टंसिंगचा फज्जा ऊडताना दिसत आहे. खरेदी-विक्री, मदतीचे वाटप, विविध कार्यक्रम, आंदोलन आदी ठिकाणी उपस्थित असलेले अनेक जण सध्या कोणाची साथ सुरू आहे हेच विसरून जात असल्याचे दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, असे मत सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.