राजकीय वादातूनच शिवसैनिकांचे हत्याकांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 05:04 AM2018-04-13T05:04:56+5:302018-04-13T05:04:59+5:30
केडगाव येथील शिवसैनिकांचे दुहेरी हत्याकांड राजकीय वादातूनच झाल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचा विजयी उमेदवार विशाल कोतकर याच्या चार कार्यकर्त्यांनी संगनमताने संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गावठी कट्ट्यातून गोळ्या घालून व गुप्तीने वार करून हत्या केली.
अहमदनगर : केडगाव येथील शिवसैनिकांचे दुहेरी हत्याकांड राजकीय वादातूनच झाल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचा विजयी उमेदवार विशाल कोतकर याच्या चार कार्यकर्त्यांनी संगनमताने संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गावठी कट्ट्यातून गोळ्या घालून व गुप्तीने वार करून हत्या केली. हत्या करणारा गुंजाळ पोलिसांच्या ताब्यात असून, फरार तिघांचा शोध सुरू आहे.
संदीप रायचंद गुंजाळ, संदीप बाळासाहेब गि-हे, महावीर उर्फ पप्पू रमेश मोकळे यांच्यासह आणखी एक अशा चौघांची नावे आतापर्यंत आरोपी म्हणून समोर आली आहेत. महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत काँगे्रसचा उमेदवार विशाल कोतकर हा निवडून आला़ निकालानंतर दुपारी सेनेचे संजय कोतकर व वसंत ठुबे सोबत होते. या वेळी संजय कोतकर व काँग्रेस कार्यकर्ता रवी खोल्लम यांच्यात फोनवर वादावादी झाली होती. फोन झाल्यानंतर संजय कोतकर व ठुबे हे खोल्लम याच्या घरी येण्यासाठी निघाले़ खोल्लम याने ही माहिती निवडणुकीतील विजयी उमेदवार विशाल कोतकर याला दिली होती. विशालच्या सांगण्यावरून संदीप गुंजाळ, मोकळे, गिºहे व आणखी एक जण खोल्लमच्या घराजवळ आले होते. संजय घटनास्थळी येताच गुंजाळ व त्याच्यात वाद होऊन गुंजाळने गोळ्या झाडल्या.
>कर्डिले-जगतापांच्या कोठडीत वाढ
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर दगडफेक करत तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची (१३ एप्रिलपर्यंत) वाढ करण्यात आली आहे़ तसेच या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या इतर १७ जणांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे़ केडगाव येथे दोघा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा कोठडीतील मुक्काम वाढला असून, त्यांच्यासह पाच जणांना १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे़
>नेत्याच्या घरी हत्याकांडापूर्वी बैठक
मयत संजय कोतकर व रवी खोल्लम यांच्यात वादावादी झाल्यानंतर केडगावात एका नेत्याच्या घरी बैठक झाली होती. या बैठकीला काही महत्त्वपूर्ण व्यक्ती उपस्थित होत्या. त्यासंदर्भात पोलीस माहिती काढत आहेत.
अशोक लांडे खूनप्रकरणात जन्मठेप भोगत असलेला काँग्रेस नेता भानुदास कोतकर सध्या पॅरोलवर बाहेर आहे.
त्याच्याशी या काळात केडगावातून संपर्क झाला होता का? यादृष्टीने तपास सुरू आहे. आमदार संग्राम जगताप व शिवाजी कर्डिले यांच्या सहभागाविषयी अद्यापपर्यंत माहिती समोर आलेली नाही.