नेवासा तालुक्यासाठी ३५० किमीच्या रस्त्यांचा मास्टर प्लॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:26 AM2021-08-24T04:26:15+5:302021-08-24T04:26:15+5:30
नेवासा : तालुक्यातील ३५० किलोमीटर रस्त्याचा मास्टर प्लॅन तयार केलेला आहे. रस्ता करताना अडवणूक होऊ नये यासाठी मानसिकता बदलली ...
नेवासा : तालुक्यातील ३५० किलोमीटर रस्त्याचा मास्टर प्लॅन तयार केलेला आहे. रस्ता करताना अडवणूक होऊ नये यासाठी मानसिकता बदलली पाहिजे. विकासकामे करण्यासाठी मला जनतेची साथ आवश्यक आहे. रस्ता कामांसाठी कितीही अडचणी आल्या तरी रस्ते पूर्ण करणार आहे, अशी ग्वाही मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.
देवगड फाटा ते श्री क्षेत्र देवगड या पाच कोटी रुपये खर्चाच्या डांबरीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराजांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
ॲड. बापूसाहेब गायके यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी गणेश भोरे, प्रा. बाळासाहेब शिंदे, हरिभाऊ शेळके, बजरंग विधाते, रामनाथ महाराज पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके, कैलास झगरे, रवींद्र शेरकर, मुळा कारखाना संचालक बाळासाहेब पाटील, भीमाशंकर वरखडे, अजय साबळे, महेश मते यांनी शंकरराव गडाख यांचा सत्कार केला.
याप्रसंगी मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडुबाळ कर्डिले, पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, मुळा कारखान्याचे संचालक भाऊसाहेब मोटे, बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके, पंचायत समितीचे सदस्य रवींद्र शेरकर, कैलास झगरे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हरिभाऊ शेळके, शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र म्हस्के उपस्थित होते.
भास्करगिरी महाराज म्हणाले, मंत्री गडाख यांना माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या कार्याचा वारसा लाभलेला आहे. राजकारण, धर्मकारण, समाजकारण या तिन्हीच्या माध्यमातून त्यांनी बंधुत्व निर्माण करण्याचे काम केले. समाजाला कामाच्या माध्यमातून सुखी करण्यासाठी मंत्रिपदासारखी शक्ती आवश्यक असते. ती आपल्या तालुक्याला गडाखांच्या रूपाने लाभली आहे. यातून तालुक्यातील अनेक विकासकामे मार्गी लागणार आहेत. त्यांनी श्री क्षेत्र देवगड देवस्थान परिसरात चांगल्या प्रकारे विकासकामे केली आहेत. देवगडसाठी पहिला डांबरी रस्ता मंजूर करून अतिथी भक्तांसाठी पहिले विश्रामगृह त्यांनीच मंजूर केले, अशा आठवणी त्यांनी जागविल्या.
----
गुणवत्तापूर्ण पद्धतीने कामे होणार
श्री क्षेत्र देवगडचा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. तो गुणवत्तापूर्ण पद्धतीने वेळेत पूर्ण करून घेणार आहोत. कोरोना काळातही तालुक्यातील रस्त्यांसाठी पहिल्या बजेटमध्ये १०० कोटी, तर दुसऱ्या बजेटमध्ये ५० कोटी रुपयांचा निधी ४४ रस्त्यांसाठी मंजूर करून आणला आहे, असे मंत्री गडाख यांनी सांगितले.
----
२२्देवगड
देवगड फाटा ते देवगड रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व इतर.