वेतन थकले: बायका, पोरांसह रस्त्यावर उतरून माथाडी कामगारांचा आक्रोश माेर्चा
By अरुण वाघमोडे | Published: December 15, 2023 02:55 PM2023-12-15T14:55:03+5:302023-12-15T14:56:35+5:30
अहमदनगर : दोन वर्षांपासून रखडलेल्या थकीत वेतनासाठी शुकवारी रेल्वे मालधक्क्यावरील माथाडी कामगारांनी बायका, पोरासं रस्त्यावर उतरून शहरातून आक्रोश मोर्चा ...
अहमदनगर: दोन वर्षांपासून रखडलेल्या थकीत वेतनासाठी शुकवारी रेल्वे मालधक्क्यावरील माथाडी कामगारांनी बायका, पोरासं रस्त्यावर उतरून शहरातून आक्रोश मोर्चा काढत महसूल प्रशासनाचा निषेध केला. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.
माथाडी मंडळ २०२१ च्या आदेशाची अंमलबजावणी करून जानेवारी पासून सुधारित दराने वेतन अदा करा, पहिल्या टप्प्यातील थकीत वेतन तत्काळ कामगारांच्या खात्यात जमा करा, दुसऱ्या टप्प्यातील वेतन वसुली लवकरात लवकर पूर्ण करा, विळद धक्क्यावरील काम बंद करून पूर्वीप्रमाणेच नगर रेल्वे स्टेशन येथील एकत्रित काम चालू ठेवा. आदी कामगण्यांसाठी हा माेर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात काळे यांच्यासह माथाडी काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, शहर विभाग अध्यक्ष सुनील भिंगारदिवे, मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, अनिस चुडीवाला, संजय झिंजे, उषाताई भगत, सुनीता भाकरे, सोपानराव साळुंके, किशोर कोतकर, सोफियान रंगरेज, रोहीदास भालेराव आदींसह कामगार मोठ्या संख्येने मोर्चात कुटुंबियांसह सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मार्चाला प्रारंभ झाला. आशा टॉकीज चौक, चौपाटी कारंजा, चितळे रोड, नेता सुभाष चौक मार्गे कापड बाजार एमजी रोडच्या भिंगारवाला चौकात मोर्चाचा समारोप झाला. कामगारांनी राज्य सरकार, महसूल विभाग, माथाडी मंडळ यांच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चा मार्ग दणाणून सोडला होता. ' दाम आमच्या कामाचं, नाही कुणाच्या बापाचं ', ' कोण म्हणतं देत नाय, घेतल्या शिवाय राहत नाय ' अशा घोषणा देत कामगारांनी आपल्या संतापाला यावेळी मोकळी वाट करून दिली. तसे निषेधाचे फलक कामगारांनी मोर्चात झळकवले.
याप्रसंगी बोलताना काळे म्हणाले राज्यातील खोके सरकार कामगारांच्या जीवावर उठले आहे. माथाडी कायदा देखील यांना मोडीत काढायचा आहे. सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा महसूल प्रशासन हे कामगार, सर्वसामान्य जनतेसाठी काम करते की. महसूलमंत्र्यांच्या खाजगी दावणीला बांधले आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कामगारांना प्रश्न तातडीने मार्गी लागला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलनकरण्याचा ईशारा त्यांनी दिला. विलास उबाळे यांनीही याप्रसंगी कामगारांच्या व्यथा मांडल्या. मोर्चा विसर्जित झाल्यानंतर किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिष्टमंडळाने जाऊन जिल्हाधिकारी यांना यांना निवेदन सादर केले.