‘माउली’ला हवा आहे मदतीचा हात; लॉकडाऊनमुळे मदत थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 03:09 PM2020-05-03T15:09:34+5:302020-05-03T15:10:47+5:30
रस्त्यावर जगणा-या बेघर, बेवारस, मनोरुग्ण, अत्याचार पीडित व गंभीर आजारी असलेल्या माता-भगिनींना आयुष्यभरासाठी निवारा देत त्यांना नवजीवन देणा-या येथील माउली सेवा प्रतिष्ठानला लॉकडाऊनच्या काळात समाजातील देणगीदारांकडून मदतीचा हात हवा आहे.
अहमदनगर : रस्त्यावर जगणा-या बेघर, बेवारस, मनोरुग्ण, अत्याचार पीडित व गंभीर आजारी असलेल्या माता-भगिनींना आयुष्यभरासाठी निवारा देत त्यांना नवजीवन देणा-या येथील माउली सेवा प्रतिष्ठानला लॉकडाऊनच्या काळात समाजातील देणगीदारांकडून मदतीचा हात हवा आहे.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेंद्र धामणे व डॉ.सुचेता धामणे यांनी नगर-मनमाड महामार्गावर शिंगवे या गावाच्या परिसरात माउली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू केलेल्या विविध प्रकल्पांमध्ये आज एकूण ३०२ माता-भगिनी व त्यांची येथेच जन्मलेली २८ बालके कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत. माउलीमध्ये दाखल असलेल्या सर्व महिला या आयुष्यभरासाठी येथे राहतात. त्यांना त्यांच्या मानसिक व शारीरिक आजारामधून ब-या झाल्या तरी कुटुंबीय स्वीकारत नाहीत. त्यामुळे हेच त्यांचे कायमचे घर आहे. गेल्या दीड महिन्यांपासून मात्र कोरोना लॉकडाऊनमुळे माउलीच्या मनगाव प्रकल्पास भेट देणा-या देणगीदारांची संख्या अजिबातच नाही. त्यामुळे देणग्या किंवा अन्नधान्याची मदत पूर्णपणे बंद आहे. या संस्थेला कुठलेही सरकारी अनुदान नाही. सर्व कार्य फक्त देणगीदारांची मदतीवरच सुरु आहे. त्यामुळे दर महिन्याचा अन्न-धान्य व औषधांचा तब्बल साडेआठ लाख रुपयांचा खर्च भागविणे धामणे दांपत्यांना अत्यंत कठीण झाले आहे. येथील प्रत्येक महिलेस मानसिक आजारासोबत विविध शारीरिक आजारांसाठीही दररोज औषधे द्यावी लागतात. अतिदक्षता विभागातील वयस्क किंवा गंभीर रुग्ण महिलांना अधिक औषधे आणि काळजीची गरज असते. प्रकल्पातील महिला व मुलांना सध्या अन्नधान्य व औषधांची नितांत गरज असल्याचे डॉ.राजेंद्र धामणे व डॉ.सुचेता धामणे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
माउली सेवा प्रतिष्ठानसाठी आजपर्यंत समाजातील विविध दानशूरांनी केलेल्या मदतीतून हा प्रकल्प उभा राहिला आणि आम्हाला काम करण्यास आणखी बळ मिळाले. सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेत कायमच दुर्लक्षिल्या गेलेल्या समाजातील वंचित घटकांसाठी अधिकाधिक जोमाने आणि समर्पणाने काम करीत राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सध्या अडचणीच्या काळात माउली सेवा प्रतिष्ठानमधील महिला आणि मुलांसाठी आपल्या मदतीची गरज आहे. माउलीच्या या कार्यासाठी मान्यवर देणगीदारांनी मदत करावी, असे आवाहन डॉ.राजेंद्र धामणे, डॉ.सुचेता धामणे यांनी केले आहे.