सेनापतींच्या रसद विना मावळे मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:16 AM2021-01-09T04:16:27+5:302021-01-09T04:16:27+5:30

बाळासाहेब काकडे श्रीगोंदा : तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींमधील ५०० जागांसाठी १ हजार ९६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दर निवडणुकीत तालुका ...

In Mavale ground without the logistics of the generals | सेनापतींच्या रसद विना मावळे मैदानात

सेनापतींच्या रसद विना मावळे मैदानात

बाळासाहेब काकडे

श्रीगोंदा : तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींमधील ५०० जागांसाठी १ हजार ९६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दर निवडणुकीत तालुका पातळीवर नेतृत्व करणारे सेनापती रसद पुरवितात. मात्र, या निवडणुकीत सेनापतींनी रसद पुरविण्याकडे कानाडोळा केला. त्यामुळे मावळ्यांना स्वबळावर प्रतिष्ठेसाठी खिंड लढवावी लागत आहे.

आ. बबनराव पाचपुते, माजी आ. राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे या नेत्यांचे गावागावांत कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतांचा दारूगोळा तयार करण्याच्या दृष्टीने त्यांचे समर्थक मैदानात उतरले आहेत.

दरवेळी साखरेचा गोडवा हा कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतो. मात्र, यावेळी सेनापतींनी तुम्ही गावात ताकद दाखवा, असे सांगून रसदसाठी हात आखडता घेतला आहे.

येळपणे, आढळगाव, उक्कडगाव, हिंगणी, वांगदरी, लिंपणगाव, अजनूज, शेडगावमध्ये तुल्यबळ लढती आहेत. त्यामुळे गाव पातळीवरील गट नेत्यांचा कस लागणार आहे. आढळगावच्या प्रभाग तीनमध्ये युवा नेते शिवप्रसाद उबाळे व माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांचे चिरंजीव श्रीकांत ठवाळ यांच्यात लढत होत आहे.

वांगदरीत भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे व नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचे खंदे समर्थक आदेश नागवडे यांचा सामना प्रेक्षणीय होणार आहे.

बिनविरोध जागा आणि गावे २४ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ६६ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. ढवळगाव ९, ढोरजा ८, म्हातारपिंपरी ६, सुरोडी ५, निमगाव खलू, लिंपणगाव, हिरडगाव, गार प्रत्येकी ४, चिखलठाणवाडी ३, चोराचीवाडी, सांगवी दुमाला, घोटवी, निंबवी प्रत्येकी दोन, चिंभळा, येवती, चांभुर्डी, घोडेगाव, पिसोरा खांड, एरंडोली, गव्हाणेवाडी, कोसेगव्हाण, राजापूर, कामठी, चिखली येथे प्रत्येकी एक अशा ६६ जागांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

---

येळपणेत पितापुत्र मैदानात

येळपणेत माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल वीर व त्यांचे पुत्र राजवर्धन वीर मैदानात उतरले आहेत. अनिल वीर यांच्या विरोधात मानसिंग ठाणगे यांनी दंड थोपटले आहेत. राजवर्धन वीर यांच्या विरोधात शरद वाघमोडे हा सामान्य कार्यकर्ता उभा ठाकला आहे.

Web Title: In Mavale ground without the logistics of the generals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.