मायंबा देवस्थानच्या जलसंवर्धन मोहिमने पर्यटनालाही चालना; धबधबे, डोंगरातील हिरवळ लक्षवेधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 03:16 PM2019-11-03T15:16:36+5:302019-11-03T15:17:33+5:30
मायंबा (मत्सेेंद्रनाथ) देवस्थानने आता धार्मिकतेला निसर्ग पर्यटनाची जोड दिली आहे. देवस्थानने जलसंवर्धन मोहीम हाती घेऊन पाच लाख वनौषधींची लागवड केली आहे. येथे पावसाळ्यात कोसळणारे धबधबे, हिरवाईने नटलेले डोंगर यामुळे पर्यटनालाही चालना मिळत आहे.
चंद्रकांत गायकवाड ।
तिसगाव : मायंबा (मत्सेेंद्रनाथ) देवस्थानने आता धार्मिकतेला निसर्ग पर्यटनाची जोड दिली आहे. देवस्थानने जलसंवर्धन मोहीम हाती घेऊन पाच लाख वनौषधींची लागवड केली आहे. येथे पावसाळ्यात कोसळणारे धबधबे, हिरवाईने नटलेले डोंगर यामुळे पर्यटनालाही चालना मिळत आहे. याबाबत विश्वस्त व आमदार सुरेश धस यांच्या पुढाकाराने एकात्मिक विकासाचा कृती आराखडा तयार केला असून येत्या पाच वर्षात अंमलबजावणीही केली जाणार आहे.
प्रती पंचवार्षिक कालखंडातील विद्यमान आमदारांची विश्वस्त पदावरील पदसिद्ध नियुक्ती, तर शेष विश्वस्त मंडळातही शिक्षित व सेवाभावी वृत्तीच्या समाजसेवकांचा समावेश असल्याने विकास कामांचा वेग वाढून भाविकांना दर्जेदार सुविधा मिळत आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून कल्याण-निर्मळ महामार्गालगतच्या मराठवाडीपासून चिंचपूर इजदे हा रस्ता, श्रीक्षेत्र मढी, शेंडगेवाडी-मायंबा हा घाट वळणाचा रस्ता पूर्णत्वास गेल्याने देवस्थानसाठीचे दळणवळण अधिक सोयीचे झाले आहे.
बडेबाबा नामाभिधान असलेले हे ठिकाण गर्भगिरी डोंगररांगाच्या माथ्यावर आहे. राज्यामध्ये सर्वाधिक स्वमालकीची जमीन क्षेत्र असलेले मायंबा हे एकमेव देवस्थान आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात धार्मिकतेबरोबरच निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीनेही या पवित्र नाथस्थानाचे महत्त्व अहमदनगर व बीड जिल्ह्यात अग्रक्रमांकावर राहणार आहे. तीन मजली प्रशस्त दर्शनबारी, सुसज्ज अन्नछत्रालय, भक्तनिवास, स्वच्छतागृहे, मत्सेंद्रनाथाचे समाधी मंदिर असा पंचवीस कोटी रूपये खर्चाच्या विकास आराखड्याचे काम सध्या सुरू आहे, अशी माहिती कार्यरत विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के यांनी दिली. शतकोटी वृक्षलागवडी अंतर्गत यावर्षी दोन हजार विविध प्रजातींची झाडे लावल्याचे त्यांनी सांगितले.
येथे गावरान (देशी) गायींची गोशाळा आहे. गायीच्या शेणाची राख, गोमूत्रापासून साबण तयार करणे, ऐतिहासिक देवतलाव सुशोभीकरण, बगीचाची आधुनिक रचना, स्वतंत्र वाहन पार्किंग व्यवस्था, अशी कामे प्रस्तावित आहेत.
पर्यटकांना मोहिनी घालणारा धबधबा
मंदिराच्या उत्तर बाजूस धोंडाई देवीचे मंदिर, त्याच बाजूला खोल दरीत अमृतेश्वर मंदिर, याच दरीतून मढी, हनुमान टाकळी तीर्थाजवळ जाणाºया कृष्णा पवनागिरी नदीचे उगमस्थान आहे. ही नदी अमृतेश्वराला वळसा घालून पाच हजार फूट दरीत झेपावते. तो उंचीवरून फेसाळणारा मायंबा धबधबा पर्यटकांना मोहिनी घालतो. या दरी प्रवाहात सिमेंट बंधाºयांची मालिकाच आहे.