लसीकरण साडेआठपासून सुरू करण्याचा महापौरांचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:21 AM2021-05-08T04:21:34+5:302021-05-08T04:21:34+5:30
अहमदनगर : कोरोनावरील लस घेण्यासाठी नागरिक सकाळपासूनच केंद्रावर येत असून, उद्या शनिवारपासून लसीकरण केंद्र सकाळी साडेआठ वाजेपासून सुरू करण्याचा ...
अहमदनगर : कोरोनावरील लस घेण्यासाठी नागरिक सकाळपासूनच केंद्रावर येत असून, उद्या शनिवारपासून लसीकरण केंद्र सकाळी साडेआठ वाजेपासून सुरू करण्याचा आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आराेग्य विभागाला दिला आहे.
महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शहरातील लसीकरणाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. शासनाकडून डोस दररोज किती वाजता येते, याबाबत विचारणा केली असता सकाळी ८ वाजता डोस उपलब्ध होत असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले. सकाळी आठ वाजता लस उपलब्ध होते. मग महापालिकेचे आरोग्य केंद्र दुपारी ११ वाजता का सुरू होते, असा प्रश्न उपस्थित करत वाकळे यांनी उद्या शनिवारपासून कोणत्याही परिस्थितीत सकाळी साडेआठ वाजता लसीकरण सुरू झाले पाहिजे. त्यासाठी सकाळी आठ वाजता जिल्हा परिषदेत जाऊन लस ताब्यात घ्या. लस मिळाल्यानंतर ती आरोग्य केंद्रांना वितरीत करा व तातडीने लसीकरण सुरू करा. जेणे करून नागरिकांना रांगेत उभे राहावे लागणार नाही.
महापालिकेकडून आरोग्याबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. लसीकरण मोहीम सध्या सुरू आहे. परंतु, डोस कमी प्रमाणात मिळत नसल्याने गोंधळ उडतो. त्यासाठी लस वाढवून देण्याची मागणी जिल्हा परिषदेकडे केली जाईल. जिल्ह्यातील काही ठिकाणी लसीकरणाला प्रतिसाद मिळत नाही, अशा ठिकाणचे डोस प्रशासनाने शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी यावेळी वाकळे यांनी केली.
...
समितीला कार्यवाहीच्या सूचना
नगरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ऑक्सिजन, लसीकरण, रेमडेसिविर, बेड आदींचा अभ्यास करून तातडीने अहवाल सादर करा,अशा सूचना नव्याने स्थापन केलेल्या आरोग्य समितीला केल्याचे वाकळे यांनी सांगितले.