महापौरांनी दुस-याच्या जमिनी लाटल्या : बाळासाहेब बोराटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 03:58 PM2019-06-21T15:58:31+5:302019-06-21T15:59:50+5:30
महापौर बाबासाहेब वाकळे यांनी अनेकांच्या जमिनी लाटल्या आहेत.
अहमदनगर : महापौर बाबासाहेब वाकळे यांनी अनेकांच्या जमिनी लाटल्या आहेत. म्हणून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमा झाली. स्वत:च्या नातेवाइकांच्याही जमिनी त्यांनी लाटल्या. ज्यांनी त्यांना महापौर होण्यासाठी पैसे दिले तेच त्यांचे खरे बोल बोलवते धनी आहेत, असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
पत्रकार परिषदेत बाळासाहेब बोराटे यांनी महापौर वाकळे यांनीच नगररचना विभागातील कल्याण बल्लाळ यांची पैसे घेऊन बदली केल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना वाकळे यांनी बोराटे यांची लायकी काय आहे? हे सर्व नगरला माहित आहे, असे प्रत्युत्तर दिले होते. त्याला उत्तर देण्यासाठी शुक्रवारी बोराटे यांनी पुन्हा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महापौरांवर अत्यंत वैयक्तिक पातळीवर टीका केली. ते म्हणाले, शंभर कर्मचा-यांचे बदलीचे अर्ज प्रलंबित असताना बल्लाळ यांची बदलीचा अर्ज मात्र तातडीने मंजूर कसा होतो. माझी लायकी काढणारे वाकळे यांची प्रत्यक्षात काय लायकी आहे? हे याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. लोढा थमार्कोलमध्ये हेल्पर म्हणून काम करण-या वाकळे यांच्याकडे एवढी संपत्ती आली कोठून ?
बदली करणे हा विषय महापौरांचा नव्हे तर आयुक्तांचा आहे. स्वत:च्या अपत्याच्या तारखा लपवणारे महापौर यांनी आधी स्वत:ची लायकी तपासावी. महापौरांनी नातेवाईकांचे प्लॉटही हडप करण्याचे सोडले नाहीत.
आपण वैफल्यग्रस्त असल्याचाही वाकळे यांचा आरोप आहे. मात्र आपण कुठे वैफल्यग्रस्त दिसतो का ? असा सवाल त्यांनी पत्रकारांना केला. शिवसेनेच्या काळात पथदिवे घोटाळा काढला. एका अभियंत्याला सोडवण्यासाठी ठेकेदारांनी कशी मदत केली, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. कल्याण रोडवरील झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी वाकळे यांचे नव्हे तर माजी महापौर सुरेखा कदम यांच्या कामाचे कौतुक केले, असेही बोराटे यांनी स्पष्टीकरण दिले.
महापौर पदासाठी 14 कोटी
महापौर पदासाठी 13 ते 14 कोटी रुपये त्यांनी खर्च केले. ही वसुली करण्यासाठी महापौर वाकळे यांनी बल्लाळ यांची बदली करून बेयादेशीर जमिनी नियमात बसलून वसुली सुरू केलेली आहे. त्यांनी महापौर झाल्यापासून शहरासाठी कोणते ठोस काम केले. बल्लाळ यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिला होता. मात्र तो प्रशासनाने स्वीकारला नाही. बल्लाळ यांची नगररचना विभागात महापौरांनी बेकायदेशीर पद्धतीने बदली केली. कुष्ठधाम परिसरातील तीन ते चार एकर जागा कोणी कोणी घेतली व कोण कोण त्या व्यवहारात आहेत, याची जनतेस माहिती मिळाली पाहिजे.
स्वत:च्याच वार्डाचा विकास
मुख्यमंत्र्यांकडून दहा कोटीचा विशेष निधी महापौरांनी मंजूर केला. मात्र त्यांनी तो स्वत:च्याच प्रभागासाठी वापरला. शहराचे महापौर आहेत याचा विसर हे वाकळे यांना पडला आहे. दहा कोटीचा निधी तुम्ही आणला की कोणी आणला? याचाही त्यांनी खुलासा केला पाहिजे, असे बोराटे म्हणाले. या पत्रकार परिषदेला शहर शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे, संभाजी कदम,गटनेते संजय शेंडगे, अनिल बोरूडे, दत्ता सप्रे, अर्जुन बोरूडे आदी उपस्थित होते.