अर्थसंकल्पात महापौर करणार नव्या संकल्पांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:15 AM2021-03-29T04:15:25+5:302021-03-29T04:15:25+5:30
अहमदनगर : महापालिकेचा सन २०२१-२२ चा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या शिफारशीसह ४ एप्रिल रोजी महासभेत सादर करण्यात येणार असून, महापौर ...
अहमदनगर : महापालिकेचा सन २०२१-२२ चा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या शिफारशीसह ४ एप्रिल रोजी महासभेत सादर करण्यात येणार असून, महापौर बाबासाहेब वाकळे यांचा हा अखेरचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे महापौर वाकळे हे अखेरच्या अर्थसंकल्पात नव्या प्रकल्पांची घोषणा करणार असल्याचे बोलले जाते.
महापालिकेचे विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ येत्या जूनमध्ये संपणार आहे. त्यामुळे वाकळे यांच्या कार्यकाळातील हा अखेरचा अर्थसंकल्प असणार आहे. महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपची सत्ता आहे. सभापती अविनाश घुले यांच्या रुपाने आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही महापालिकेच्या सत्तेत सहभाग घेतला आहे. त्यांनी बैठकांचा धडाका लावला असून, अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची शिफारस केली आहे. यामध्ये सावेडी, बोल्हेगाव, केडगाव, मुकुंदनगर येथे भुयारी गटार योजना, महामार्गापासून जेथून मनपाची हद्द सुरू होते, अशा ठिकाणपासून पुढे दोन कि.मी. पर्यंत रोड, सीना नदी सुशोभिकरण, गंज बाजार भाजी मार्केट विकसित करणे, केडगाव येथे तीन एकरवर क्रीडा संकुल उभारणे, चितळे रोडवर व्यापारी संकुल, पिंपळगाव माळवी येथे चित्रपटनगरी, सावेडी गावठाण येथे व्यापारी संकुल, सावेडी नाट्य संकुल पूर्ण करणे, सावेडी गावासाठी अत्याधुनिक रुग्णालये, महापुरुषांचे पुतळे यासह विविध प्रकल्पांचा समावेश आहे. नव्या संकल्पाच्या शिफारशीसह अर्थसंकल्प महापौर कार्यालयास सादर करण्यात आला आहे. महापौर वाकळे यांच्याकडून काही महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश अर्थसंकल्पात केला जाईल. गेल्या अडीच वर्षात वाकळे यांनी स्वच्छता, पाणी, दिवाबत्ती, या मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करत स्मार्ट एलईडी हा महत्वाकांक्षी प्रकल्प आणला. याशिवाय पुढील अर्थिक वर्षांत ते कोणते प्रकल्प सुचवितात, याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.
......
राष्ट्रवादीचा पहिला, भाजपाचा शेवटचा अर्थसंकल्प
अंदाजपत्रक प्रशासनाकडून स्थायी समितीला सादर होतो. स्थायी समिती सध्या राष्ट्रवादीकडे आहे. सभापती अविनाश घुले यांच्या रुपाने राष्ट्रवादीने सत्तेत सहभाग घेतला असून, राष्ट्रवादीने शिफारस केलेला गेल्या अडीच वर्षांतील हा पहिलाच अर्थसंकल्प आहेत. भाजपाचे बाबासाहेब वाकळे यांची मुदत येत्या जून मध्ये संपणार असल्याने त्यांच्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या संकल्पांचा यंदाचा अर्थसंकल्प असणार आहे.