महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी पडद्याआड खलबते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:14 AM2021-06-30T04:14:55+5:302021-06-30T04:14:55+5:30
अहमदनगर : महापौरपदासाठी सेनेचा एकच अर्ज दाखल झाला होता, तर उपमहापौरपदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत नाव निश्चित होत नव्हते. दुसरीकडे काँग्रेसचे ...
अहमदनगर : महापौरपदासाठी सेनेचा एकच अर्ज दाखल झाला होता, तर उपमहापौरपदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत नाव निश्चित होत नव्हते. दुसरीकडे काँग्रेसचे दीप चव्हाण निरोपाच्या प्रतीक्षेत राहिले. अखेर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आघाडीचा धर्म पाळण्याचा संदेश चव्हाण यांना दिला आणि बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला. मंगळवारी दुपारी पडद्याआड बऱ्याच काही घडामोडी घडून आल्याने नेते मंडळीही घामाघूम झाली होती.
उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून गणेश भोसले, विनीत पाऊलबुद्धे, कुमार वाकळे, माजी नगरसेवक संजय चोपडे यांच्या पत्नी मीना चोपडा यांची नावे आघाडीवर होती. हा निर्णय आमदार संग्राम जगताप यांनी नगरसेवकांवर सोडला होता. परंतु, नगरसेवकांमध्ये एकमत झाले नाही. अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापर्यंत घोळ सुरूच होता. उपमहापौर पदासाठी इच्छुक असलेले कुमार वाकळे विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात, तर संजय चोपडा महापौर दालनात थांबले होते. गणेश भोसले हे नगरसेवकांसह स्थायी समिती सभापतींच्या दालनात तळ ठोकून होते. सेनेचे नगरसेवकही राष्ट्रवादीचा अर्ज दाखल करण्यासाठी पालिकेत आले होते. परंतु, अर्ज कुणाचा दाखल करायचा, यावर राष्ट्रवादीत एकमत झाले नव्हते. आमदार संग्राम जगताप यांच्यासह पक्षनिरीक्षक अंकुश काकडेही पालिकेत आले. तोपर्यंत उपमहापौर पदावर एकमत झाले नव्हते. चोपडा हे आमदार अरुण जगताप यांच्या संपर्कात होते. आमदार अरुण जगताप हे त्यांच्या आयुर्वेद महाविद्यालयातील संपर्क कार्यालयात होते. तेथून ते आमदार संग्राम जगताप यांच्याशी संपर्क साधत होते. शेवटी भोसले किंवा चोपडा या निर्णयापर्यंत राष्ट्रवादीचे नेते आले. अर्ज दाखल करण्याच्या काही वेळ आधी पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी नगरसचिव कार्यालयातील एका छोट्या खोलीत तिघा इच्छुकांची बैठक घेतली. ही बैठक बराच वेळ सुरू होती. अर्ज घेण्यासाठी १ वाजेपर्यंत मुदत होती. शेवटच्या तीन मिनिटांत भोसले यांच्यासाठी अर्ज घेतला. अर्ज दाखल करण्यासाठी वेळ कमी असल्याने घाईघाईत अर्ज दाखल करण्यात आला.
.....
गटनेत्यांसह काँग्रेसचे नगरसेवक होते पालिकेत
महापौर निवडणुकीत विश्वासात न घेतल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांनी महापौर व उपमहापौर पदासाठी सोमवारी अर्ज घेऊन ठेवले होते. काँग्रेस अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करणार, अशी चर्चा होती. काँग्रेसने अर्ज दाखल केले असते तर मतदान प्रक्रियेला सामोरे जावे लागणार होते. त्यात राज्यात महाविकास आघाडी असल्याने ‘आघाडीत फूट’ असा संदेशही गेला असता. हे सर्व टाळण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांचा प्रयत्न सुरू होता. काँग्रेसचे पाचही नगरसेवक त्यांना मानणारे आहेत. चव्हाण वगळता चारही नगरसेविकांचे पती शेवटच्या क्षणापर्यंत जगताप यांच्यासोबत होते. माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, निखिल वारे, फारुक शेख आणि गटनेते धनंजय जाधव हे शेवटपर्यंत पालिकेत उपस्थित राहिले.
....
सेनेचा दुसरा गट गैरहजर
शिवसेनेचा एक गट राष्ट्रवादीवर सुरुवातीपासूनच नाराज आहे. हा गट राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांचा अर्ज दाखल करताना उपस्थित नव्हता. सोमवारी महापौर पदासाठी अर्ज दाखल झाला. त्या वेळी माजी नगरसेवक विक्रम राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते आदी उपस्थित होते. परंतु, आमदार जगताप यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करतानाच्या फोटोत ते दिसत नाहीत. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्यासह सातपुते, राठोड हे उपमहापौर पदाचा अर्ज दाखल करताना उपस्थित नव्हते.
....
भाजप तटस्थ
महापौर पदासाठी भाजपकडे उमेदवार नव्हता. भाजपकडे १५ नगरसेवक आहेत. महापौर व उपमहापौर निवडणुकीत तटस्थ राहण्याबाबत भाजपची सेना व राष्ट्रवादीशी चर्चा झाल्याचे बोलले जाते. त्या बदल्यात भाजपला विरोधी पक्षनेते पदाचा शब्द दिला असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.
....
दीप चव्हाण मुंबईत
महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून अर्ज दाखल करण्याबाबत कुठलाही निरोप मिळाला नाही. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी मंगळवारी मुंबई गाठली. तिथे त्यांनी महसूलमंत्री थोरात यांची भेट घेतल्याचे चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
....
- महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आहे. त्याची अंमलबजावणी तिन्ही पक्षांनी केली असून, हे तिन्ही पक्ष महापालिकेत एकत्र काम करतील.
- अंकुश काकडे, पक्षनिरीक्षक, राष्ट्रवादी
....
- आमदार संग्राम जगताप यांनी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांची भेट घेऊन विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याबाबत चर्चा केली. विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेस आघाडीसोबत राहील. आघाडीसोबत राहण्याबाबत वरिष्ठांना कळविले आहे.
- निखिल वारे, माजी नगरसेवक, काँग्रेस