महापौर निवडणुक : जनादेशाची थट्टा; शहरही वेठीला
By सुधीर लंके | Published: December 27, 2018 10:45 AM2018-12-27T10:45:00+5:302018-12-27T10:47:35+5:30
मतदारांचा कौल व पक्षांची धोरणे न पाहता ‘ज्याच्या हाती पैसा तो महापौर’ असा नवाच फॉर्म्युला नगरला सुरु झाला आहे.
सुधीर लंके
अहमदनगर : मतदारांचा कौल व पक्षांची धोरणे न पाहता ‘ज्याच्या हाती पैसा तो महापौर’ असा नवाच फॉर्म्युला नगरला सुरु झाला आहे. सर्वच पक्ष व त्यांचे नेतेही हा पैशांचा तमाशा उभा करतात, असे चित्र आहे. यात जनादेश व शहराच्या भवितव्याचीही थट्टा सुरू आहे. मतदार विकत घेण्यापासून ते महापौर पदाच्या विक्रीपर्यंतचा कळस गाठला गेला आहे. अनेक मतदारांनीही या खरेदी विक्रीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावला आहे.
महापौर पदाची शुक्रवारी निवड होणार आहे. मात्र, शिवसेना वगळता एकाही पक्षाने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. महापौर पदाचा चेहरा हा सभ्य, चारित्र्यवान, निष्कलंक, विकासाची दृष्टी असलेला व अभ्यासू असावा ही किमान अपेक्षा आहे. आर्थिक क्षमता व नात्यागोत्यापेक्षा या निकषांवर महापौर ठरावा. ज्या पक्षांना महापौर पदाच्या स्पर्धेत उतरायचे आहे त्यांनी आपल्या नगरसेवकांची बैठक घेऊन व जनतेचीही मते आजमावून लोकशाही मार्गाने हा चेहरा ठरविणे अपेक्षित आहे. मात्र, कुठलाही पक्ष ही नीती राबविताना दिसत नाही. ‘जे उमेदवार पैशाने किंवा नात्यागोत्यात बलवान ते महापौर पदाचे उमेदवार’ असाच पायंडा पडू पाहत आहे. यात लोकशाहीच वेठीला धरल्यासारखी परिस्थिती आहे.
युती व आघाडी कोणत्या पक्षांची व्हावी यालाही काही धरबंद दिसत नाही. वास्तविकत: शिवसेनेला सर्वाधिक म्हणजे २४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महापौर पदासाठी या पक्षाने अग्रक्रमाने दावा करणे अपेक्षित आहे. सेनेने प्रयत्न केल्यास त्यांना बहुमत गाठणे शक्य आहे. मात्र, सेनेलाच आपला महापौर करण्यात रस नाही, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. सेनेने आपल्या निष्ठावान कार्यकर्त्याची उमेदवारी लोकशाही पद्धतीने जाहीर करुन प्रामाणिक प्रयत्न करणे अपेक्षित होते. नगरसेवक सहलीला पाठविण्याचा पायंडाही त्यांनी मोडायला हवा होता. कारण आपल्या नगरसेवकांवर त्यांचा नैतिक धाक हवा. मात्र, तसे घडले नाही. सेनेने बाळासाहेब बोराटे यांची उमेदवारी जाहीर केली. बोराटे यांनी यापूर्वी सेनेशी दगाफटका केलेला आहे. निष्ठेपेक्षा ते सत्तेसोबत राहण्यासाठी मांडवली करतात, असाच त्यांचा राजकीय इतिहास आहे. असे असतानाही सेनेने त्यांना उमेदवारी दिल्याने राठोड यांच्या भूमिकेबाबतच शंका उपस्थित होत आहे. सेनेचेच अनेक लोक याबाबत नाराज दिसतात.
शिवसेना-भाजप हे नैसर्गिक मित्र आहेत. या दोन पक्षांनी रितसर युती केल्यास महापौर पदाच्या घोडेबाजाराला लगाम बसेल. मतदारही ही नैसर्गिक युती स्वीकारतील. परंतु राठोड व भाजपचे खासदार दिलीप गांधी हे त्याबाबत टाळाटाळ करत असल्याची परिस्थिती आहे. या नैसर्गिक मैत्रीऐवजी भाजप-राष्टÑवादी यांच्यात ‘उघड’ अथवा ‘छुपी’ आघाडी झाली तर ती बहुधा राठोड यांनाही हवी आहे. कारण तसे झाल्यास ही अभद्र युती असल्याचा आयता मुद्दा त्यांना विधानसभा निवडणुकीत मिळेल. भाजप सत्तेसाठी जगताप-कोतकर यांना जवळ करते, असा प्रचार ते करतील. राठोड हे अत्यंत चतुर आहेत. बोराटे यांना उमेदवारी देऊन त्यांनी ‘ओबीसी’ चेहरा पुढे केला आहे. बोराटे निवडून आले तर ओबीसी मतदारांत ते सहानुभूती मिळवतील. पराभव झाला तर त्याचे खापर ते राष्टÑवादी व भाजपवर फोडून त्यातूनही ‘ओबीसी’ मतदारांत सहानुभूती मिळवतील. कसेही झाले तरी ते फायद्यात आहेत.
यात भाजप व राष्टÑवादीही आपापला फायदा उठवेल. खासदार गांधी यांचा गट विधानसभेला राठोड यांच्याऐवजी राष्टÑवादीला छुपी मदत करेल व लोकसभेला राष्टÑवादीची मदत घेईल. भाजपचा महापौर झाल्यास सरकारकडून काही प्रकल्प मंजूर करण्याची खेळी भाजप खेळेल. त्यातूनही ते सेनेची कोंडी करतील. भाजपला सोबत घेतल्यास राष्टÑवादीच्या व्होट बँकेला काहीही फटका बसणार नाही. कारण त्यांचे राजकारण हे भाजपपेक्षा सेनेच्या विरोधात आहे. उलट भाजपची मते पाठिशी उभी झाल्यास संग्राम जगताप यांच्या मतांची बेरीज वाढेल. विधानसभेला भाजपने सेनेच्या विरोधात उमेदवार दिल्यास पुन्हा मतांत विभागणी होऊन राष्टÑवादी फायद्यात. त्यामुळे राष्ट्रवादीलाही भाजपशी मैत्री कदाचित हवी असावी. यात शरद पवार यांची अडचण होणार असल्याने ते या आघाडीला पाठिंबा देतील का? याबाबत साशंकता आहे.
काँग्रेसचे राधाकृष्ण विखे व सुजय विखे हे पिता-पुत्र यात काहीही ठाम भूमिका घेताना दिसत नाहीत. लोकसभा निवडणुकीत खासदार गांधी वगळता त्यांना सर्वांची मदत हवी आहे. विखे हे सेनेलाही नाराज करतील, असे दिसत नाही. सर्वच पक्षांचे व नेत्यांचे आपापले आडाखे आहेत. जनतेच्या व शहराच्या मताला यात कोठेही किंमत उरलेली दिसत नाही.
नगरसेवकांच्या सहली कशासाठी?
निवडणूक झाली की आपले नगरसेवक सहलीवर पाठवायचे हा पायंडाच पडला आहे. याचा अर्थ आपल्या तिकिटावर निवडून आलेले नगरसेवक दुसऱ्या पक्षाला विकले जातात, असा पक्षांनाच संशय आहे. यात नगरसेवकांची प्रतिमा मलीन होते. पण, ही बाब पक्ष, नेते व नगरसेवक यापैकी कुणालाच आक्षेपार्ह वाटत नाही.
वाकळे यांची शहानिशा कोण करणार?
बाबासाहेब वाकळे यांचे तिसरे अपत्य हे विहीत मुदतीनंतर जन्मलेले असल्याने ते अपात्र ठरतात, असा मुद्दा सेनेचे पराभूत उमेदवार अर्जुन बोरुडे यांनी न्यायालयात उपस्थित केला आहे. या मुद्यात तथ्य असेल तर ती गंभीर बाब आहे. तथ्य नसेल तर तीही वाकळे यांची नाहक बदनामी आहे. मात्र, हा मुद्दा चर्चेत असताना त्यावर शिवसेना, भाजप, राष्टÑवादी, काँग्रेस यापैकी कुठलाही पक्ष बोलायला तयार नाही. सेनाही बोरुडे यांच्या तक्रारीबाबत मौन पाळून आहे.
शासकीय यंत्रणा, वैद्यकीय संघटनांचे मौन
बाबासाहेब वाकळे यांच्या तिस-या अपत्याच्या जन्मतारखेबाबत डॉ. नानासाहेब अकोलकर यांनी दिलेल्या प्रमाणपत्रांवरुन गोंधळ वाढला आहे. अकोलकर यांनी दिलेले प्रमाणपत्र खरे असेल तर वाकळे अडचणीत सापडतात. मात्र हे प्रमाणपत्र आपण अनावधानाने दिले, असा अकोलकर यांचा दावा आहे. अकोलकर यांनी असे का केले? त्यांनी दिलेले प्रमाणपत्र खरे की खोटे? याची महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व वैद्यकीय संघटनेनेही शहानिशा करणे अपेक्षित आहे. मात्र, या यंत्रणाही निव्वळ हा तमाशा पाहत आहेत. आयुक्त राहुल द्विवेदी हे खमके आहेत. त्यांनी या प्रकरणाचा साक्षमोक्ष लावणे अभिप्रेत आहे. मेडिकल कौन्सिलनेही आपली भूमिका जाहीर करायला हवी.