वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांची बदली रद्द, जामखेड करांच्या प्रयत्नांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 01:23 PM2020-08-25T13:23:39+5:302020-08-25T13:26:52+5:30
जामखेड - ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर युवराज खराडे यांची कोरोना महामारी च्या काळात अचानक झालेली बदली ही त्यांच्यावर अन्याय करणारी आहे.याबद्दल जामखेडकर यांनी तीव्र शब्दात विरोध नोंदविला होता. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाशल्यचिकित्सक अहमदनगर यांनी सदर बदली रद्द केली.
जामखेड - ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर युवराज खराडे यांची कोरोना महामारी च्या काळात अचानक झालेली बदली ही त्यांच्यावर अन्याय करणारी आहे. याबद्दल जामखेडकर यांनी तीव्र शब्दात विरोध नोंदविला होता तर सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले यांनी दि. २५ रोजी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तसेच सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाशल्यचिकित्सक अहमदनगर यांनी सदर बदली रद्द केली तर रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिक्षकपदी डॉ. संजय वाघ यांची नियुक्ती केली असून त्यांनी पदभार घेतला आहे. यानिमित्ताने ग्रामीण रूग्णालयाला कायमस्वरूपी वैद्यकीय अधिक्षक मिळाला आहे.
ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक युवराज खराडे यांची आठ दिवसांपूर्वी अचानक जिल्हा रूग्णालयात बदली करण्यात आली होती. यामुळे शहर व तालुक्यात राजकीय पक्ष व विविध संघटना यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तसेच गणेशोत्सव निमित्ताने अयोजीत शांतता बैठकीत तीव्र पडसाद उमटले होते.
कोरोनाच्या काळामध्ये जामखेड तालुक्यातील जनतेची गेल्या सहा महिन्यापासून अत्यंत प्रामाणिकपणे सेवा प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. युवराज खराडे यांनी केली आहे त्यांच्या प्रयत्नामुळे जामखेड तालुक्यातील अनेक रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्याचबरोबर जामखेड तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. कोवीड योध्दा म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला होता अशातच त्यांची अचानक बदली झाल्याने सामाजिक कार्यकर्ते व इतरांनी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
भाजपाचे कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष डॉ. भगवान मुरूमकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. मधुकर राळेभात, मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष शेरखान पठाण, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, नगरसेवक शामीर सय्यद, मनसेचे सनी सदाफुले, प्रहार संघटनेचे अध्यक्ष जयसिंग उगले, हिंदुस्थान प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले आदी संघटनेचे पदाधिकारी यांनी डॉ. युवराज खराडे यांची बदली रद्द न केल्यास रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. युवराज खराडे यांच्या बदली रद्द झाल्यामुळे आ. रोहीत पवार व जिल्हा शल्यचिकित्सक यांचे आभार विकी सदाफुले यांनी मानून मंगळवार रोजी होणारा रस्ता रोको रद्द केल्याचे सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले यांनी सांगितले.