औषधी वनस्पती निरोगी जीवनाचा मार्ग दाखवतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:22 AM2021-03-09T04:22:23+5:302021-03-09T04:22:23+5:30
राहुरी : निसर्गामध्ये हजारो प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. त्यांची ओळख करून त्यांच्या सहवासात गेल्यास सुखी, समृद्धी आनंदी जीवन ...
राहुरी : निसर्गामध्ये हजारो प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. त्यांची ओळख करून त्यांच्या सहवासात गेल्यास सुखी, समृद्धी आनंदी जीवन जगण्याची कला सापडते. त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने धावपळीच्या युगात औषधी वनस्पतीच्या सहवासात राहणे गरजेचे असल्याचे मत निसर्ग उपचारतज्ज्ञ सुभाष जाधव यांनी व्यक्त केले.
राहुरी तालुका पतंजली योग समितीच्या वतीने राहुरी येथील ट्राय फार्ममध्ये ‘औषधी वनस्पतीची ओळख’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुभाष जाधव म्हणाले, निसर्गामध्ये अनेक रोग बरे करण्याची ताकद आहे. मात्र, अलीकडच्या काळात मनुष्य निसर्गापासून दूर गेला आहे. त्यामुळे जीवनात दुःख वाट्याला आले आहे. अशा परिस्थितीत निसर्गत: असलेल्या विविध वनस्पतींचा उपयोग मनुष्यासाठी केला पाहिजे. पूर्वीपासून निरोगी जीवनासाठी औषधी वनस्पतीचा उपयोग झाला आहे. औषधी वनस्पतीच्या सहवासातून अनेक वनस्पतींची ओळख होते. यातूनच सुखी जीवन मिळते. त्या दृष्टिकोनातून औषधी वनस्पतींची माहिती करून घेणे गरजेचे आहे. या क्षेत्रात भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वनस्पती उपलब्ध आहेत. त्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे, असे मत सुभाष जाधव यांनी व्यक्त केले.
यावेळी ट्राय फार्ममध्ये असलेल्या विविध औषधी वनस्पतींची माहिती उपस्थितांना शिवार फेरीमार्फत देण्यात आली. ट्राय फार्मचे संचालक भाऊसाहेब येवले यांनी स्वागत केले. अर्चना झिने यांनी आभार मानले.