साईनगरीत देश-विदेशातील भाविकांचा मेळा; जागतिक साई मंदिर विश्वस्त परिषदेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 06:12 PM2017-12-23T18:12:30+5:302017-12-23T18:14:53+5:30
पंढरपुरात जसा विठ्ठल भक्तांचा मेळा एकवटतो, तसा साई मंदिर विश्वस्तांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने साईभक्तांचा मेळा राज्य, देश, भाषेच्या सगळ्या सीमा तोडून बंधुभावाने साईनगरीत एकवटला आहे.
शिर्डी : पंढरपुरात जसा विठ्ठल भक्तांचा मेळा एकवटतो, तसा साई मंदिर विश्वस्तांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने साईभक्तांचा मेळा राज्य, देश, भाषेच्या सगळ्या सीमा तोडून बंधुभावाने साईनगरीत एकवटला आहे. ‘माझा माणूस जगात कोठेही असला, तरी चिमणीच्या पायाला दोर बांधून ओढतात, तसे मी त्याला ओढून आणीन’ असे साईबाबा म्हणत. त्याची प्रचिती या निमित्ताने आली.
जागतिक साई मंदिर विश्वस्तांच्या परिषदेचे हे दुसरे वर्षे आहे. देश-विदेशातून आलेल्या भाविकांचा व संस्थान व्यवस्थापनाचा उत्साह कायम असला, तरी येणा-या प्रतिनिधींच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या वर्षी या परिषदेसाठी देशभरातून अकराशे मंदिरांचे प्रतिनिधी आले होते. तर यंदा ही संख्या साडेदहाशे आहे. याशिवाय विदेशातून गेल्यावेळी ४४ मंदिरांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यंदा ही संख्या १९ वर आली आहे. यंदा प्रतिनिधींची संख्या दुपटीने वाढेल असा व्यवस्थापनाचा कयास होता. मात्र देश-विदेशात सार्इंचा प्रचार-प्रसार करणा-या चंद्रभानू सत्पती गुरुजींनी दोन दिवसांपूर्वी हैद्राबादेत अशाच कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे येथील संख्येत घट झाली असल्याची शक्यता आहे.
आजच्या परिषदेसाठी कॅनडा, हाँगकाँग, जपान, मलेशिया, नेदरलँड, श्रीलंका, लंडन व अमेरिकेतून १९ साई मंदिरांचे प्रतिनिधी आले आहेत. यात कॅनडा तीन, अमेरिका नऊ, श्रीलंकेतील दोन, तर अन्य देशांतून प्रत्येकी एक मंदिराचा प्रतिनिधी आला आहे. भारतातील जवळपास २४ राज्यांतील मंदिरांचे प्रतिनिधींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. यात सर्वाधिक आंध्र प्रदेशातून ३१७, तर चंदीगड, हिमालच प्रदेश, केरळ या राज्यांतून सर्वाधिक कमी प्रत्येकी एक मंदिराचा प्रतिनिधी आला आहे. महाराष्ट्रातूनही जवळपास दीडशे साई मंदिराचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.
देशभरात जवळपास आठ हजार, तर विदेशात पाचशे साई मंदिरे आहेत़ त्या अनुषंगाने केवळ अकरा टक्के मंदिराच्या प्रतिनिधींनीच संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. साईनगरच्या मैदानात या परिषदेसाठी भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. यात एलईडी स्क्रिन बसविण्यात आल्या आहेत. संस्थान प्रकाशित पुस्तके, सीडी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. सर्व प्रतिनिधींची निवास, भोजन व दर्शनाची व्यवस्था संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.