बारमाही कृत्रिम पाऊस पाडणारे ‘मेघदूत ग्राफीक्स मॉडेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 04:47 PM2019-06-23T16:47:24+5:302019-06-23T16:47:47+5:30
बाळासाहेब काकडे श्रीगोंदा : गेल्या काही वर्षांपासून पावसाचा लहरीपणा ही मानवापुढील मोठी समस्या आहे. त्यामुळे दुष्काळाचे प्रमाण वाढत आहे. ...
बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : गेल्या काही वर्षांपासून पावसाचा लहरीपणा ही मानवापुढील मोठी समस्या आहे. त्यामुळे दुष्काळाचे प्रमाण वाढत आहे. या संकटावर मात करण्यासाठी श्रीगोंदा येथील विद्यार्थ्याने समुद्राच्या पाण्यावर ‘हिट ट्रीटमेंट’ करून बारमाही कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ‘मेघदूत ग्राफिक्स मॉडेल’ तयार केले. याबाबतचा प्रस्ताव लवकरच हवामान खात्यासमोर मांडण्यात येणार आहे.
येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात बारावीत (वाणिज्य) शिकत असलेल्या प्रशांत मारूती गांजुरे या विद्यार्थ्याने हे संशोधन केले आहे. दहावीत शिकत असल्यापासूनच त्याला रोबोट तयार करण्याचा छंद आहे. एक दिवस त्याने स्वत:ची मोटारसायकल आणि त्यातील इलेक्ट्रिक सिस्टीम उघडून पाहिली. स्वयंचलित सिस्टीमचा अभ्यास केला. त्याचा फायदा त्याला आता होत आहे.
पाऊस का पडत नाही? कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी काय केले पाहिजे? हे प्रश्न प्रशांतला कायम सतावत होते. त्याने घरातील हिटरचा वापर करून पाण्याची वाफ तयार केली. वाफेचे छोट्या ढगात रूपांतर झाले. ते कृत्रिम ढग पुठ्ठ्याच्या सहाय्याने त्याने अडविले. तिथे ढगाचे रूपांतर जलबिंदूत झाले. हाच प्रयोग व्यापक स्वरूपात करता येऊ शकतो, असे प्रशांतला वाटले. त्याने समुद्राच्या पाण्यावर कृत्रिम हिट ट्रीटमेंट करण्यासाठी एक ग्राफिक्स तयार केले आहे. जास्तीत पावसाचे ढग तयार करून पाहिजे तेव्हा कृत्रिम पाऊस कसा पाडता येईल, याबाबत मेघदूत मॉडेल तयार केले. यातून निश्चितच पाऊस पडेल, असे त्याचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसात हवामान खात्यासमोर तो हे मॉडेल मांडणार आहे.
‘फरशी क्लीन’ करण्याचा रोबोट..
प्रशांतने सुरूवातीला मित्रांबरोबर प्लंबिंगची कामे करून पैसे जमा केले. याच पैशातून ‘फरशी क्लीन’ करण्याचा पहिला रोबोट तयार केला. त्यानंतर त्याने आणखी काही रोबोट बनविण्याचे काम हाती घेतले आहे.
समुद्राच्या पाण्यावर सूर्यकिरण प्रमाणाने कृत्रिम हिट ट्रीटमेंट तयार करून पाऊस पाडण्याचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो. मेघदूत मॉडेलने पाहिजे तेव्हा पाऊस पाडता येऊ शकतो. हिट ट्रीटमेंटचा समुद्रातील जलसंपत्ती व परिसरातील मानवी जीवनावर अनिष्ठ परिणाम होणार नाही. -प्रशांत गांजुरे, विद्यार्थी, श्रीगोंदा