प्रत्येक तालुक्यात शिवाजी महाराजांचे स्मारक; विखे पाटील यांची माहिती
By शिवाजी पवार | Published: March 10, 2024 02:06 PM2024-03-10T14:06:15+5:302024-03-10T14:06:38+5:30
श्रीरामपुरातून सुरवात, पुतळ्याचा प्रश्न मार्गी लागला
शिवाजी पवार
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शहरात गेल्या ४० वर्षांपासून रखडलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय मार्गी लागला. भाजपचे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महाराजांचे स्मारक उभारणार आहे. त्याची सुरवात श्रीरामपुरातून झाली, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
येथील आझाद मैदानावर अतुल्य सेवा सन्मान पुरस्कारांचे वितरण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, तालुकाध्यक्ष दीपक पटारे, समन्वयक नितीन दिनकर, शिवाजीराव कपाळे, अविनाश कुदळे, केतन खोरे, सुरज सूर्यवंशी, रामपाल पांडे, प्रसन्न धुमाळ, मारुती बिंगले यावेळी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यातील तरुणांना रोजगार देण्यासाठी कौशल्य विकास संस्था उभारण्यात येणार आहे. नगर, राहाता व श्रीरामपूर येथे या संस्था सुरू करू. मागील आठवड्यात नगर दक्षिणमध्ये कौशल्य विकास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तेथे २५ हजार बेरोजगार तरुण आले होते. त्यातील ७ हजार तरुणांना तेथे रोजगार देता आला. कौशल्य विकासातून उद्याच्या पिढीला समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे. सबका साथ सबका विश्वास या भाजपच्या नार्यामुळे लोकांचा विश्वास वाढला आहे. तळागाळातील जनतेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य पोहोचविण्याचा आपला प्रयत्न आहे. देश पातळीवर गोसेवा आयोगाची स्थापना झाली. राज्यामध्ये आपण त्या खात्याचा मंत्री झाल्यानंतर राज्य गोसेवा आयोगाची स्थापना केली. त्या माध्यमातून गोशाळा निर्माण करण्याचा उद्देश आहे.
शहराची वाढती लोकसंख्या गृहित धरून पुढील २५ वर्षांचा विचार करून १७८ कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर करून दिली. योजनेचे काम लवकरच सुरू होणार आहे, असे विखे पाटील म्हणाले.