फेसबुक हॅक करून मानसिक छळ अन् आर्थिक लूट
By अरुण वाघमोडे | Published: September 25, 2020 02:01 PM2020-09-25T14:01:56+5:302020-09-25T14:03:18+5:30
अहमदनगर : सायबर गुन्हेगारांकडून फेसबुक अकाउंट हॅक करून मानसिक छळ आणि आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये गेल्या चार ते पाच महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली झाली आहे. येथील सायबर पोलीस स्टेशनमध्ये फेसबुक हॅकिंगच्या दिवसाला एक दोन तक्रारी दाखल होत आहेत. तांत्रिक गोष्टीच्या अज्ञानामुळे अनेक जण हॅकर्सच्या जाळ्यात अडकले आहेत.
भारतात फेसबुक हे अॅप्लीकेशन वापरणाºयांची मोठी संख्या आहे. सायबर गुन्हेगारांनी आॅनलाईन फसवणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून फेसबुककडे मोर्चा वळविला आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून या फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. फेसबुक अकाउंट हॅक करुन त्या अकाउंटचा अॅक्सेस हॅकर स्वत:कडे घेतात. युझरला त्याचा अॅक्सेस परत देण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. पैसे नाही दिले तर त्याच्या फेसबुक अकाउंटवर अश्लील फोटो व व्हिडिओ अपलोड केले जातात. युजरच्या फेसबुक वरील फोटोंचे मॉर्फिंग करून त्याचे अश्लील फोटोत रूपांतर केले जाते. तसेच युजरच्या फ्रेंडलिस्टमध्ये असणारे त्याचे मित्र व मैत्रिणींना अश्लील भाषेत चॅट करून त्याची बदनामी करून त्यास मानसिक त्रास दिला जातो. या त्रासाला वैतागून अनेक जण या गुन्हेगारांना ते मागतील तेवढे पैसे पाठवून देतात.
पाच महिन्यात दीडशेपेक्षा जास्त तक्रारी
येथील सायबर पोलीस स्टेशनमध्ये मागील चार ते पाच महिन्यांमध्ये फेसबुक हॅकिंग संदर्भात दीडशेपेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्रारदारांमध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यातील ९९ टक्के तक्रारी या आर्थिक फसवणुकीच्या संदर्भातील आहेत.
कोरोना उपचारासाठी मागितले जातात पैसे
सध्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सायबर गुन्हेगारांनी याचाही फायदा घेण्याचे काम सुरू केले आहे. नागरिकांचे फेसबुक अकाउंट हॅक करुन त्यांच्या फ्रेंडलिस्टमधील सर्व मित्रांना ‘उपचारासाठी मला पैशाची नितांत गरज आहे’ असे मेसेज पाठवले जातात. मित्र अडचणीत आहे, असे समजून अनेक जण जास्त विचारपूस न करता त्याने पाठविलेल्या गुगल पे अथवा फोन पे नंबरवर काही रक्कम टाकून देतात. काही दिवसानंतर कळते की हा फेक मेसेज होता.
...अशी घ्यावी काळजी
फेसबुक अकाउंटचा पासवर्ड हा मोबाईल नंबर, नाव व जन्मतारीख असा ठेवू नये. तसेच पासवर्ड वेळोवेळी बदलावा. फेसबुक वापरकर्त्यांनी आपल्या फेसबुकचे सेटिंग चेंज करून प्रोफाइल लॉकिंग ही सेटिंग ठेवावी आपले फोटो, पोस्ट, कमेंट बाबत प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन ओन्ली फ्रेंड्स सेटिंग करून घ्यावी जेणेकरून वैयक्तिक फोटो सार्वजनिक होणार नाहीत.
तांत्रिकदृष्ट्या सोशल मीडियाचा सुरक्षितरीत्या कसा वापर करावा याची प्रथम सर्वांनी माहिती करून घेणे गरजेचे आहे. आपली फसवणूक होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. आपले अकाऊंट हॅक करून कोणी पैसे मागत असेल तर त्याला पैसे न देता त्यासंदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार करावी.
- अरुण परदेशी, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन.