हजारेंच्या उमेदवारीवर सोशल मीडियात मंथन
By Admin | Published: September 17, 2014 11:27 PM2014-09-17T23:27:17+5:302024-07-11T18:08:11+5:30
पारनेर : अण्णांनी उमेदवारी केली तर हरकत काय? यासह अन्य प्रश्नांवर पारनेर तालुका विकास मंचच्या साईटवर युवकांनी विचारमंथन सुरु केले आहे.
पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पारनेर मतदारसंघातून बिनविरोध निवडून दिले पाहिजे. अण्णांनी उमेदवारी केली तर हरकत काय? यासह अन्य प्रश्नांवर पारनेर तालुका विकास मंचच्या साईटवर युवकांनी विचारमंथन सुरु केले आहे.
देशाला माहितीचा अधिकार,जनलोकपाल कायदे यासह राज्यात सात कायदे मिळवून देणारे पारनेर तालुक्याचे सुपुत्र अण्णा हजारे यांनाच विधानसभेच्या आखाड्यात उतरवून सोशल मीडियात नवी चर्चा उडवून दिली आहे. पण यानिमित्ताने युवक हिरिरीने मत नोंदवत असल्याचे समोर आले आहे. विकास मंचचे प्रमुख गणेश कावरे, गौरव भालेकर यांनी विविध मुद्दे चर्चेत येतील, अशी आखणी केली आहे. उद्योजक दशरथ बोरूडे यांनी अण्णा हजारे यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या माणसाला बिनविरोध निवडून देणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. तर वकील जगदीप शिंदे, गणेश कावरे यांनी तर पूर्णवेळ प्रचारात उतरण्याची तयारी दर्शविली आहे.
अण्णांनी देशातील सामान्य माणसांना अनेक कायदे मिळवून दिले, मग पारनेर मतदारसंघ देशात मॉडेल बनविण्यासाठी व पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अण्णा हजारेंनाच उमेदवारी पाहिजे, असे मत सतीश भालेकर, गजानन अंबुले, विशाल शिंदे यांनी मांडले आहे. तर के. ई. एम. हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब बांडे यांनी अण्णा हे राजकीय व्यक्ती नाहीत तर सामाजिक मार्गदर्शक असल्याचे म्हटले आहे. आपण अण्णांना उमेदवारीचे साकडे घालू, असे गौरव भालेकर,अभय गट व इतरांनी मत मांडले आहे. विजय वाघमारे यांनी याबाबत निष्फळ चर्चा नको असे म्हटले तर संजय वाघमारे यांनी अण्णा हे इतरांच्या तुलनेत खूप मोठे आहेत.
अण्णांचे स्वीय सहाय्यक दत्ता आवारी यांनी चर्चेत भाग घेताना अण्णा या विषयावर राजी होणार नाहीत, त्यांनी यापूर्वीच राजकीय पक्ष स्थापन करण्याला विरोध केला असून केजरीवाल यांच्या कंपूत ते गेले नाही, याकडे लक्ष वेधले आहे. त्यांचे कर्र्तृत्व खूप मोठे आहे त्यांना मतदारसंघापुरते संकुचित करू नका, असे मत डॉ. नरेंद्र मुळे, नजीर तांबोळी, उदय शेरकर यांनी मांडले आहे.
(तालुका प्रतिनिधी)