गणरायांना जल्लोषात निरोप; मिरवणुकीवर ड्रोनने ठेवली नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 06:54 PM2017-09-06T18:54:35+5:302017-09-06T18:54:47+5:30
गुलालासह फुलांची उधळण़़ पारंपरिक वाद्यांसह डिजेचा दणदणाट़़ संगीताच्या तालावर थिरकणारी तरूणाई आणि बाप्पांचा जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणात मंगळवारी नगरकरांनी लाडक्या गणरायांना भावपूर्ण निरोप दिला़
अहमदनगर : गुलालासह फुलांची उधळण़़ पारंपरिक वाद्यांसह डिजेचा दणदणाट़़ संगीताच्या तालावर थिरकणारी तरूणाई आणि बाप्पांचा जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणात मंगळवारी नगरकरांनी लाडक्या गणरायांना भावपूर्ण निरोप दिला़ सकाळी दहा वाजता सुरू झालेला हा मिरवणूक सोहळा रात्री बारा वाजता समाप्त झाला़ किरकोळ अपवाद वगळता ही मिरवणूक शांततेत पार पडली़
सकाळी साडेआठ वाजता जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्याहस्ते शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीची विधीवत पूजा होऊन मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ झाला़ फुलांच्या रथात बाप्पांना विराजमान करत निघालेली ही मानाची मिरवणूक नगरकरांच्या डोळयाचे पारणे फेडणारी ठरली़ ३५० पैकी एकूण १५ गणेश मंडळे मिरवणूक सोहळ्यात सहभागी झाली होती़ शहरातील रामचंद्र खुंट येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला़ माळीवाडा येथील समझोता मंडळ, शिवसेना व नवरत्न मंडळाने मिरवणुकीत डिजे वाजविला़ डिजेच्या तालावर रंगलेले गाणे आणि तरूणांचे नृत्य यामुळे रात्री साडेअकरापर्यंत मिरवणूक नवीपेठेच्या मागेच रेंगाळली होती़ पंधरापैकी सात मंडळांनीच निर्धारित वेळेत विसर्जन केले. उर्वरित आठ मंडळांनी रात्री बारानंतर मूक वातावरणात विसर्जनस्थळी जाऊन विसर्जन केले़ ही मिरवणूक पाहण्यासाठी नगरकरांनी मोठी गर्दी केली होती़ जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, उपाधीक्षक आनंद भोईटे हे वरिष्ठ अधिकारी मिरवणूक मार्गावर तळ ठोकून होते़ मिरवणूक मार्गात सहभागी झालेल्या प्रत्येक मंडळासाठी स्वतंत्र पोलीस पथक नेमण्यात आले होते़ त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार झाला नाही़ मंडळाच्या गणपतीसमवेतच पथकही चालत होते़ रात्री बाराच्या ठोक्याला पोलिसांनी डिजेचा दणदणाट बंद करून डिजे ताब्यात घेतले़
लक्षवेधी मिरवणूक
पारंपरिक पद्धतीने आणि वैशिष्ट्यपूर्ण मिरवणुकीसाठी ओळखल्या जाणाºया विशाल गणपती मंदिरात प्रतिष्ठापना केलेल्या श्रींची मिरवणूक यंदाही मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली़ महिलांच्या दांडिया, विद्यार्थ्यांचे लेझीम पथक आणि ढोलपथकाने मिरवणुकीत रंगत आणली़ सायंकाळी सातनंतर ही मिरवणूक दिल्लीगेटबाहेर पडली़ मिरवणुकीत आ़ संग्राम जगताप, खा़दिलीप गांधी, माजी आमदार अनिल राठोड व माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी सहभागी होत ढोलताशांवर ताल धरला होता़ महापौर सुरेखा कदम व त्यांचे पती संभाजी कदम यांनी मानाच्या गणपतीचा रथ ओढून सहभाग घेतला़