भूगर्भातील बदलामुळे घारगावात सौम्य भूकंप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 07:24 AM2018-08-27T07:24:20+5:302018-08-27T07:24:56+5:30
भूगर्भात घडून येणाऱ्या लहानमोठ्या बदलांमुळे उद्भवणारे भूकंपही सौम्य अथवा तीव्र असतात. सौम्य भूकंपात जमीन किंचित कंप होण्यापेक्षा अधिक काहीही होत नाही.
घारगाव/संगमनेर (जि. अहमदनगर) : भूगर्भात घडून येणाऱ्या लहानमोठ्या बदलांमुळे उद्भवणारे भूकंपही सौम्य अथवा तीव्र असतात. सौम्य भूकंपात जमीन किंचित कंप होण्यापेक्षा अधिक काहीही होत नाही. तीव्र भूकंपात जमीन वेगाने हादरते. घारगाव परिसरात जाणवत असलेले धक्के हे भूकंपाचेच असून ते खूप सौम्य आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, तसेच अफवांवरही विश्वास ठेवू नये, असे आवाहन नाशिकच्या ‘मेरी’ या संस्थेचे शास्त्रज्ञ, तहसीलदार व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव, माहुली, नांदूर खंदरमाळ, बोरबन, कोठे, अकलापूर परिसरात गेल्या दहा दिवसांत दोन वेळा भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर रविवारी या परिसरास तहसीलदार साहेबराव सोनवणे, ‘मेरी’च्या वैज्ञानिक अधिकारी चारूलता चौधरी, सहाय्यक संशोधक कैलास गिराम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे, कनिष्ठ भूवैज्ञानिक अजिंक्य काटकर, पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांनी पाहाणी केली. यावेळी डॉ. बडदे म्हणाले, घराची नियमित पाहणी व भिंतीची मजबुती करावी. जड वस्तू घरामध्ये अथवा उंच ठिकाणी ठेवू नयेत. कपाटे भिंतींना बांधलेली राहतील अशी ठेवावी.
‘मेरी’च्या चौधरी म्हणाल्या, घारगाव व परिसरातील भूकंपामुळे नागरिकांनी घाबरू नये. या भूकंपाची ‘मेरी’च्या भूकंपमापक यंत्रावर २.८ व २.५ रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे. हे भूकंपाचे धक्के खूप सौम्य आहेत. भूकंपप्रवण प्रदेशाची डहाणू ते गुजरात ही भूपृष्ठ भ्रंश रेषा (फॉल्ट लाइन) आहे. या रेषेवर हा परिसर येत असल्याने हे धक्के जाणवत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.