घारगावात भूकंपाचे सौम्य धक्के
By सुदाम देशमुख | Published: July 10, 2024 12:41 PM2024-07-10T12:41:43+5:302024-07-10T12:41:55+5:30
घारगाव परिसरात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता अत्यंत कमी होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
घारगाव : (जिल्हा अहमदनगर): हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे ४.५ इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद सकाळी ७.१५ वाजता झाली. सदर भूकंपाचे सौम्य धक्के अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात जाणवले.
संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात बुधवारी (१० जुलै) पहाटे सकाळी ७.१५ ते ७.१८ वाजताच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के बसले. एका जागेवर बसलेल्या काही जणांना हे धक्के दोनवेळा जाणवले. पूर्व -पश्चिम धक्का बसल्याचे येथील ग्रामस्थ उद्धव गणपुले, सुनील लांडगे, रवींद्र धात्रक, अशोक मधे, भगवंता भुजबळ आदींनी सांगितले. भूकंपात घरातील कपाटे, भांड्यांचा आवाज झाल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, घारगाव परिसरात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता अत्यंत कमी होती. या घडामोडींच्या नोंदी नाशिक येथील भूकंपमापक यंत्रावर झाल्या नसल्याचे मेरी संस्थेच्या भूवैज्ञानिक चारूलता चौधरी यांनी सांगितले.
यापूर्वीही अनेकवेळा बोटा तसेच घारगाव येथे सौम्य भुकंपाचे धक्के जाणवले होते. याबाबत नाशिक येथील भूकंपमापक यंत्रावर नोंदी झालेल्या आहेत.