सुपा, नारायनगव्हाण येथे दूध संकलनास होणार सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:38 AM2021-02-06T04:38:57+5:302021-02-06T04:38:57+5:30
सुपा : सुपा येथील पारनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे कामकाज पाहण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय ...
सुपा : सुपा येथील पारनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे कामकाज पाहण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय प्रशासकीय मंडळाला संघाच्या निवडणुकीपर्यंत कामकाज पाहण्याची संधी मिळाली आहे. संघाचे सुपा व नारायणगव्हाण येथे शीतकरण प्लॅन्ट असून, याठिकाणी दूध संकलनास सुरुवात करणार आहे.
सुपा येथील पारनेर रस्त्यालगत असणाऱ्या शहजापूर चौकातील मोक्यातील जागेवर व्यापारी संकुल उभे करून त्याद्वारे संघाच्या उत्पन्नात भर घालण्याबरोबरच त्या माध्यमातून तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे संघाचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब पठारे यांनी सांगितले.
प्रशासकीय संचालक मंडळ नेमताना मागील संचालक मंडळाने तीन वर्षांत दूध संघाचे संकलन सुरू करण्याबाबत कार्यवाही केली नाही. संघाच्या मालकीच्या नारायणगव्हाण येथील शीतकरण केंद्र हस्तांतरण केले नाही. संघाचे चार वर्षांपासून लेखापरीक्षण केले नाही. संघाच्या सुपा येथील शीतकरण केंद्राच्या मालमत्तेच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने तिचे नुकसान झाले. लाखो रुपये किमतीच्या मालमत्तेची चोरी झाली. याबाबत आपधूप येथील दूध संस्थेने शासनाकडे तक्रार केली होती. त्याची लेखापरीक्षकांमार्फत तपासणी होऊन विभागीय उपनिबंधक, नाशिक यांनी प्रशासकीय मंडळाची नेमणूक केल्याचे पठारे यांनी सांगितले. त्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी दुग्धविकासमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्याचे प्रशासकीय मंडळाचे संचालक संभाजी रोहोकले व सुरेश थोरात यांनी सांगितले.
---
व्यापारी संकुलही उभारणार
शासनाचा प्रशासकीय मंडळ नेमण्याच्या निर्णयाविरोधात दाखल केलेला दावा याचिकाकर्त्यांनी मागे घेतल्याने पुढील संचालक मंडळाच्या निवडणुकीपर्यंत दादासाहेब पठारे यांचा अध्यक्ष म्हणून काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तर त्यांचे अन्य दोन सहकारी म्हणून संभाजी रोहोकले व सुरेश थोरात यांनी त्यांना मदत होणार आहे. त्यामुळे दूध संकलन करण्यासाठी त्यांनी मंचर येथील पराग दूध यांच्याशी बोलणी केली असून, त्यांच्यामार्फत बल्क कूलर्स बसवले जाणार आहेत. सुप्यातील जागेवर व्यापारी संकुल उभे करण्यासाठी लवकरच कार्यवाही करण्याबाबत हालचाली सुरू होत आहेत.